‘अग्निहोत्र २’ ची कथा दिवसेंदिवस उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचत आहे. मालिकेत नवनव्या रहस्यांचा उलगडा होत असतानाच आता एका नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. संगीता असं या पात्राचं नाव असून अभिनेत्री पल्लवी पाटील संगीताची व्यक्तिरेखा साकारणार आहे.
संगीता ही गोव्यात वाढलेली एक अनाथ मुलगी आहे. बिनधास्त, बेफिकीर आणि हजरजबाबी. इंग्रजी बोलण्याची तिला आवड आहे पण तेही तिला नीट जमत नाही. श्रीमंतांना सर्व गोष्टी सहज मिळतात पण गरीबांना खूप संघर्ष करावा लागतो याचा तिला प्रचंड राग आहे. अग्निहोत्री वाड्याशी या संगीताचा काय संबंध आहे? याची रहस्यमय गोष्ट ‘अग्निहोत्र २’ च्या पुढील भागांमध्ये उलगडणार आहे.
‘अग्निहोत्र २’ मधल्या या भूमिकेसाठी पल्लवी खुपच उत्सुक आहे. या अनोख्या व्यक्तिरेखेविषयी सांगताना पल्लवी म्हणाली, अग्निहोत्रचा पहिला सीजन मी संपूर्ण पाहिला होता. त्यामुळे लहानपणापासूनच या मालिकेविषयी प्रचंड कुतुहल आहे. ‘अग्निहोत्र २’ येतंय असं जेव्हा मला कळलं तेव्हा या मालिकेत काम करण्याची माझी इच्छा होती. माझ्या नशिबाने संगीता या व्यक्तिरेखेसाठी मला विचारणार झाली. संगीता ही व्यक्तिरेखा इतकी वेगळी आहे की त्याविषयी ऐकताच मी तातडीने होकार दिला. संगीता ही गोव्यात वाढलेली मुलगी आहे. विदेशी पर्यटकांना मार्गदर्शन करण्याचं काम करते. त्यामुळे तिचा लूकही पूर्णपणे वेगळा आहे. अशा रुपात मी या आधी कधीच दिसलेली नाही. या भूमिकेसाठी मी गोवन भाषा सध्या शिकतेय. थोडेफार जॅपनिस आणि रशियन शब्द शिकण्याचाही प्रयत्न करतेय.
‘बदनाम गलिचो बादशो’ आणि ‘पणजीचो ढोकरो’ हे दोन नवे शब्दही मी शोधून काढले आहेत. सीन करताना खूप मजा येतेय. अशी भूमिका मिळणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. ‘अग्निहोत्र २’ च्या निमित्ताने ते पूर्ण होतंय असं म्हणायला हवं. स्टार प्रवाह वाहिनीच्या रुंजी या मालिकेतून मी पदार्पण केलं होतं आणि या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा या वाहिनीशी जोडली जातेय याचा आनंद आहे. या मालिकेतली माझी एण्ट्रीही खूप हटके पद्धतीने शूट करण्यात आलीय. त्यामुळे तुमच्याप्रमाणेच मी देखिल पडद्यावर संगीताची एण्ट्री पाहण्यासाठी उत्सुक आहे.