पुणे - येत्या १ मार्च रोजी ‘रोटी डे’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. जनसामान्यात हा उपक्रम पोहचवण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी मराठी कलावंताच्या वतीने सोमवारी पदयात्रा काढण्यात आली, यामध्ये नाट्य -चित्रपट कलावंत, तंत्रज्ञ यांनी एकत्र येत गरजूंसाठी मदत करण्याचे आवाहन केले.
अभिनेता अमित कल्याणकर याच्या पुढाकारातून उदयास आलेल्या ‘रोटी डे’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे यंदा ४ थे वर्ष आहे. पत्रकार भवन ते अलका टोकीज चौक दरम्यान काढण्यात आलेल्या या पदयात्रेत ‘मुळशी पॅटर्न’ फेम अभिनेत्री मालविका गायकवाड, अभिनेते सुनील गोडबोले, श्रीकांत यादव, विनोद खेडकर, बिग एमजे संग्राम, संगीतकार ओंकार केळकर, निर्माता प्रमोद रणनवरे, निवेदिका शोभा कुलकर्णी, कला-दिग्दर्शक गिरीश कोळपकर, अनिरुद्ध हाळंदे आदींसह अ. भा. नाट्य परिषद, अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
आज जगभर विविध समाजसेवी संस्था, संवेदनशील नागरिक गरजू लोकांची मदत करत असतात, मात्र संस्थेलादेखील गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याच्या मर्यादा आहेत. यातूनच ‘रोटी डे’ ही अभिनव संकल्पना उदयास आली. या दिवशी, प्रत्येकाने आपल्या परिसरातील गरजू व्यक्तींना फळे, पोळी-भाजी, वरण-भात, ज्वारी, बाजरी इ. सामान मदतीच्या स्वरुपात द्यावे, तसेच त्या व्यक्तीबरोबर आपला एक फोटो काढून सोशल मिडीयावर ‘रोटी डे’ च्या निमित्ताने शेअर करावा. सोशल मीडियाची ताकद ओळखून, हा मदतीचा हात अधिकाधिक लोकापर्यंत पोहोचवणे, हा त्यामागील उद्देश असल्याचे अमित कल्याणकर याने सांगितले.
