मुंबई - ‘मन झालं बाजिंद’ या मालिकेतील सालस कृष्णा आणि रांगडा राया प्रेक्षकांना भावले आहेत. कृष्णा आणि राया ही जोडी देखील प्रेक्षकांची अगदी आवडती जोडी बनली आहे. ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. या मालिकेवर आणि त्यातील व्यक्तिरेखांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. रायाचा रांगडा लूक सगळ्यांच्या पसंतीस पडला असून त्याच्यासारखी स्टाईल त्याचे चाहते फॉलो करत आहेत.
मन झालं बाजींद या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. या मालिकेत नुकतंच प्रेक्षकांनी पाहिलं की कृष्णाला शॉक लागून ती शुद्ध हरपते. राया तिला हॉस्पिटलला घेऊन जातो पण रायाला डॉक्टर सांगतात, कृष्णा वाचण्याची शक्यता कमी आहे. रायाला हे ऐकून धक्का बसतो. राया कृष्णाला वाचवण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न सुरू करतो. कृष्णाचा जीव वाचतो पण शरीराला जबरदस्त शॉक बसल्याने तिचा उजवा हात निकामी होतो. उजव्या हाताच्या संवेदनाच निघून जातात. त्यामुळे कृष्णाला सीएची परीक्षा देता येणार नाही असा पेच निर्माण होतो. पण राया कृष्णाच्या बाजूने खंबीरपणे उभा राहतो.
या सर्व घटनांनंतर कृष्णा आणि राया यांचा लग्नानंतरचा पहिला मकरसंक्रातीचा सण येणार आहे. कृष्णाच्या हाताला संवेदना नसल्यामुळे कृष्णाची पतंग उडवण्याची इच्छा पूर्ण होणार का किंवा कृष्णाला हळदीकुकूं समारंभात भाग घेता येणार का, हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल. तसेच कृष्णासमोरच्या या आव्हानांना ती कशी सामोरी जाणार हेदेखील पाहणे इंटरेस्टिंग असेल.
‘मन झालं बाजिंद’ ही मालिका झी मराठीवर प्रसारित होते.
हेही वाचा - कपिल शर्मा बायोपिक 'फनकार'मधून उलगडणार कॉमेडी किंगची अनटोल्ड स्टोरी