मुंबई : हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते-निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर नुकतीच कर्करोग शस्त्रक्रिया करण्यात आली असून डॉक्टरांच्या माहितीनुसार ती यशस्वी झाली आहे. सध्या महेश मांजरेकर घरी परतले आहेत. त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे समजते आहे.
रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया
काही दिवसांपूर्वी महेश मांजरेकर यांना मूत्राशयाच्या कर्करोगाचे निदान झाले होते. यानंतर डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता. सुमारे दहा दिवसांपूर्वी महेश मांजरेकर यांना मुंबईच्या चर्नी रोडवरील एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. इथेच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
मांजरेकरांची प्रकृती उत्तम
ईटाइम्सच्या वृत्तानुसार, मांजरेकर आता घरी आराम करत असून त्यांची प्रकृती चांगली आहे. त्यांच्यावरील शस्त्रक्रिया सुरळीत पार पडल्याचे कळविण्यात आले आहे. मांजरेकर यांचा वाढदिवस १६ ऑगस्ट रोजी रुग्णालयातच साजरा करण्यात आला होता आणि त्याच दिवशी त्यांच्यातर्फे त्यांचा नवीन चित्रपट ‘व्हाइट’ची घोषणा करण्यात आली होती. हा चित्रपट ते संदीप सिंग आणि राज शांडिल्य यांच्यासोबत बनवत आहेत. महेश मांजरेकर यांचा ड्रीम प्रोजेक्ट ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ याचीही घोषणा सावरकरांच्या १३८ व्या जयंतीच्या दिवशी करण्यात आली होती.
बिग बॉसचे सूत्रसंचालनही मांजरेकरच करणार
कर्करोगाने ग्रस्त असताना आणि त्यावर शस्त्रक्रियेची तयारी सुरु असताना मांजरेकर अतिशय सकारात्मक मनःस्थितीत होते असेच यावरून दिसते. ते सूत्रसंचालन करीत असलेल्या ‘बिग बॉस मराठी’ची तयारीही जोरात सुरु असून वाहिनीकडून तेच सूत्रसंचालक राहणार असल्याचे सूचित केले जात आहे. थोडक्यात मराठी मनोरंजन सृष्टीतील दबदबा असलेले नाव महेश मांजरेकर हे आपल्या कामाआड येणाऱ्या कर्करोगासारख्या रोगालाही जुमानत नाहीयेत असंच म्हणायला वाव आहे. त्यांचे हिंदीतील अनेक प्रोजेक्ट्स मार्गावर असून त्यासाठी महेशजी लवकरच उपलब्ध होतील असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले आहे. महेश मांजरेकर लवकरच बरे व्हावेत अशी आशा त्यांच्या फॅन्सकडून व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - ‘बिग बॉस ओटीटी’ मधील ‘हा’ स्पर्धक आहे माधुरी दीक्षितचा फेव्हरेट!