मुंबई - तुमच्यामध्ये जर अभिनयाचा किडा असेल, जर तुम्हाला अभिनय क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी एक उत्तम मंच हवा असेल, जर तुम्हाला मराठी सिनेसृष्टीतील दिग्गजांकडून मार्गदर्शन हवं असेल. तर फक्त आणि फक्त तुमच्यासाठी तो चक्क ९ वर्षांनी परत येतो आहे. आता हा तो कोण आहे? हा तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर तो म्हणजे 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' या कार्यक्रमाचा मंच.
या कार्यक्रमाने ९ वर्षांपूर्वी अनेक उदयोन्मुख कलाकारांसाठी उत्तम मंच उपलब्ध करून दिला. या मंचाने अनेक कलाकार देखील दिले आहेत, जे आज त्यांच्या कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. अभिनय क्षेत्रात येण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाला हवा हवासा असलेला हा मंच पुन्हा एकदा येतोय ही सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यावेळी देखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक टॅलेंटेड युवकांना आपली कला सादर करण्याची सुवर्ण संधी मिळेल. या मंचावरून पुढे आलेला अभिनेता अभिजीत खांडकेकर नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करताना पाहायला मिळेल.
या मंचाबद्दल बोलताना माझ्या नवऱ्याची बायको मधील गॅरी म्हणजेच अभिनेता अभिजीत खांडकेकर म्हणाला, प्रत्येक कलाकाराला असं वाटत असतं की, आपल्याला एक स्टेपिंग स्टोन मिळावा, लोकांपर्यंत आपलं टॅलेंट कसं पोहोचवता येईल याची संधी मिळावी. मी आर.जे. असण्यापूर्वी एकपात्री नाटक, राज्य नाट्यस्पर्धा असं प्रायोगिक स्तरावर बरंच काम केलं होतं. पण मराठी टेलिव्हिजन आणि सिनेसृष्टीमध्ये एंट्री व्हावी, असं खूप माझ्या मनात होतं आणि ही सुवर्णसंधी मला महाराष्ट्राचा सुपरस्टारच्या निमित्ताने मिळाली.
या कार्यक्रमाच्या दरम्यानच आमची दिग्गज दिग्दर्शकांशी ओळख झाली, कारण ते या मंचावर आम्हाला मार्गदर्शन करायला यायचे. किंबहुना कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही ज्यांना ऑडिशनच्या निमित्ताने भेटलो. त्या सगळ्यांनीच शो पाहिला होता. या कार्यक्रमामुळे आमचा स्ट्रगल अर्धा कमी झाला होता, असं मला वाटतं.
कार्यक्रमानंतर आम्हाला प्रेक्षक ओळखू लागले होते. एखाद्या नवख्या कलाकाराला दिग्दर्शकाकडे कामासाठी पायपीट करताना आपण पाहतो. पण आमच्या बाबतीत तसं झालं नाही. कारण, झी मराठी वाहिनीने तावून सुलाखुनच कलाकार निवडले असणार अशी खात्री असल्यामुळे आम्ही जिद्दीने आणि मेहनतीने काम मिळवले. असा वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम झी मराठी वाहिनीने आणला आणि त्या कार्यक्रमातून आम्ही बरेच स्पर्धक कलाकार म्हणून बाहेर पडलो आणि आजही आम्ही या इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहोत. यासाठी सुवर्णसंधी देण्याऱ्या या महाराष्ट्राचा सुपरस्टार कार्यक्रमाच्या मंचाच्या ऋणातून मला मुक्त नाही व्हायचंय. मला खूप आनंद होतोय की, आता महाराष्ट्रातील होतकरू कलाकारांना सुद्धा या मंचामुळे आपलं टॅलेंट लोकांपुढे सादर करण्याची संधी मिळेल.
विजेता कोणीही असो, पण या स्पर्धेचा भाग असल्याचा फायदा सर्व स्पर्धकांना होईल. कारण या मंचाकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. आता या मंचावर सूत्रसंचालक म्हणून पाऊल ठेवण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. यावेळी धाकधूक कमी आहे कारण मी स्पर्धक नाही आहे, पण सर्व स्पर्धकांचा प्रवास मात्र मी अत्यंत जवळून अनुभवणार आहे.