मुंबई - सुप्रसिद्ध गीतकार, कवी, पटकथा लेखक, चित्रपट दिग्दर्शक आणि नाटककार अशी विविध विशेषणं असलेल्या गुलजार यांचा आज ८६ वा वाढदिवस आहे. त्यांचे खरे नाव संपूर्ण सिंह कालरा असे होते. गुलजार यांच्या गीतांनी आजवर लाखो-करोडो हृदयांवर राज्य केलं आहे. मॅकेनिकपासून ते गीतकारपर्यंत त्यांचा हा प्रवास कसा होता जाणून घेऊयात....
बालपणापासूनच शायरी आणि संगीताची आवड -
१८ ऑगस्ट १९३४ साली गुलजार यांचा जन्म झाला. त्यांना बालपणापासूनच संगीत आणि शायरीची आवड होती. कॉलेजमध्ये असताना ते सतार वादक रविशंकर आणि सरोद वादक अली अकबर खान यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावत असत.
स्वप्नांना आकार देण्यासाठी गाठली मुंबई -
भारत-पकिस्तान फाळणीदरम्यान गुलजार यांचे कुटुंब अमृतसर येथे आले. त्यानंतर गुलजार यांनी आपल्या स्वप्नांना आकार देण्यासाठी मुंबईत पाऊल ठेवले. आपला उदरनिर्वाह करण्यासाठी जमेल तशी कामेही ते करत असत. येथेच सुरुवातीला त्यांनी मॅकेनिकचेही काम केले होते. दरम्यान ते सिनेसृष्टीतील दिग्गजांनाही भेटले. त्यानंतर दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी आणि हेमंत कुमार यांच्या हाताखाली सहाय्यक म्हणूनही त्यांनी काम केले.
'मोरा गोरा अंग लेई ले' पासून केली सुरुवात -
गुलजार यांनी आपल्या सिनेकरिअरची सुरुवात १९६१ साली केली. तेव्हा ते विमल राय यांचे सहाय्यक म्हणून काम करत होते. १९६३ साली विमल राय यांच्या 'बंदिनी' या चित्रपटासाठी गीतकार म्हणून गुलजार यांनी 'मोरा गोरा गोरा अंग लेई ले' हे गीत लिहिले. १९७१ साली 'मेरे अपने' चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शनातही पाऊल ठेवले. या चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी 'कोशिश', 'परिचय', 'अचानक', 'खूशबू', 'आंधी', 'मौसम', 'किनारा', 'किताब', 'नमकीन', 'अंगूर', 'इजाजत', 'लिबास', 'लेकिन', 'माचिस' और 'हू तू तू' यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले.
गुलजार यांना मिळालेले पुरस्कार -
आपली आवड आणि प्रतिभेमुळे गुलजार आजही चाहत्यांवर राज्य करतात. त्यांना २० फिल्मफेअर आणि ५ राष्ट्रिय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. २०१० साली त्यांना 'स्लमडॉग मिलेनियर' च्या 'जय हो' गाण्यासाठी ग्रॅमी पुरस्कारानेही गौरविण्यात आले.
भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी त्यांना २००४ साली 'पद्मभूषण' हा पुरस्कारही मिळाला. उर्दू भाषेतील लघुकथा संग्रह 'धुआं'साठी २००२ साली साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला आहे. तसेच 'दादासाहेब फाळके' या पुरस्कारानेही ते सन्मानित झाले आहेत.
राखी यांच्यासोबतचे नाते-
गुलजार यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचे झाले तर, ते अभिनेत्री राखी यांच्या पाहताक्षणी प्रेमात पडले होते. दोघांचीही भेट एका कार्यक्रमात झाली होती. तेव्हा दोघेही आपल्या करिअरच्या उच्च स्थानी होते. १९७३ साली दोघांनी लग्न केले. मात्र, ४० वर्षानंतर दोघेही वेगळे झाले.
लग्नानंतर राखी यांनी चित्रपटात काम करू नये, असे गुलजार यांना वाटत होते. राखी यांनीही तसे वचन दिले होते. मात्र, पुढे त्यांना चित्रपटात काम करावे, असे वाटले म्हणूनच दोघांचे मार्ग वेगळे झाले, असे बोलले जाते.
आजही गुलजार यांच्या यशावर राखी आनंदी होतात. तर, गुलजार यांच्या कवितांमध्ये, गीतांमध्ये राखी यांची छबी पाहायला मिळते. 'इश्किया' चित्रपटातील 'दिल तो बच्चा है जी' गुलजार यांनी राखी यांच्यासाठीच लिहिले होते, असेही म्हटले जाते. या गाण्यात त्यांचे राखीप्रती असलेले प्रेम स्पष्ट होते.