थ्रीसुर (केरळ) - थ्रीसुर मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी नवीन आणि जानकी हे दोघेजण बोनी एम्सच्या क्लासिक ‘रास्पुतीन’ या गाजलेल्या गाण्यावर डान्स करीत असतानाचा व्हिडिओ आठवड्यापासून व्हायरल झाला होता. वैद्यकीय महाविद्यालयाच्या कॉरिडोरमध्ये त्यांच्या विश्रांतीच्या वेळात डान्स करतानाचा हा व्हिडिओ त्याच्या डान्स स्टेप्समुळे अनेकांच्या पसंतीस उतरला. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. त्यांच्या कॉलेजच्या गणवेशातच हे दोघे 'रा रा रास्पुतीन, लव्हर ऑफ द रशियन क्विन' या गाण्यावर थिरकले. ३० सेकंदाचा हा व्हिडिओ काही तासातच व्हायरल झाला आणि इंटरनेटवर वादळ निर्माण झाले.
या व्हिडिओवर विद्यार्थांचा एक गट कौतुकाचा वर्षाव करीत असतानाच हायकोर्टाचे वकील आर. कृष्णराज यांनी याला वेगळेच वळण दिले. या परफॉर्मन्सला त्यांनी धार्मिक रंग देत यात काही तरी गडबड असल्याचे म्हटले. केवळ त्यांनीच यातील विद्यार्थी कोणत्या धर्माचा आहे हे दाखवण्यासाठी त्या विद्यार्थ्याच्या संपूर्ण नावाचा उल्लेख केला. दोघेही वेगवेगळ्या समुदायाचे प्रतिनिधित्व करीत असल्यामुळे जानकीच्या पालकांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला वकिलाने दिला.

"जानकी आणि नवीन. थ्रिसूर मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विद्यार्थी आहेत जानकी एम ओमकुमार आणि नवीन के रसाक. यात काहीतरी चुकीचा वास येत आहे. जानकीच्या पालकांनी सावधगिरी बाळगणे चांगले. निमिषाच्या आई (निमिषा उर्फ फातिमा हिने धर्मांतर करुन केरळ सोडले आणि २०१५मध्ये अफगाणीस्तानातील इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेत सामील झाली.)ची गोष्ट सिद्ध करते की काळजी करण्यापेक्षा सावधगिरी बाळगणे चांगले. आम्ही जानकीचे वडील एम ओमकुमार आणि त्यांच्या पत्नीसाठी प्रार्थना केली पाहिजे, " असे आर कृष्णराज यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर लिहिले आहे.
आर कृष्णराज यांच्या या पोस्टवर सोशल मीडियातून सडकून टीका होत आहे. या प्रकरणाला धार्मिक वेळण देण्याच्या प्रयत्नाला नेटिझन्सनी डान्स करणे म्हणजे जिहाद करणे नाही, अशा अर्थाचा हॅशटॅग वापरून कडाडून विरोध दर्शवला आहे. काही जण म्हणतात, की आर कृष्णराज हे भाजपचे सहानुभूतीदार आहेत.
नवीन आणि जानकीच्या समर्थनार्थ थ्रीसुर मेडिकल कॉलेजमधील अनेक विद्यार्थी 'रा रा रस्पुतीन, लव्हर ऑफ द रशियन क्विन' या गाण्यावर डान्स करीत व्हिडिओ करीत आहेत. तर व्हडिओचा प्रचार करणारा एक ग्रुपही तयार झाला आहे.

हेही वाचा - ऑस्करची घोषणा केल्यानंतर प्रियंका चोप्रा करणार 'बाफ्टा'चे प्रेझेन्टेशन