सांगली - यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार सोहळा लांबणीवर गेला आहे. दरवर्षी रंगभूमीदिनी 5 नोव्हेंबर रोजी रंगभूमीवरील हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्याची परंपरा आहे. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाट्य परिषदेकडून हा पुरस्कार सोहळा रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
61 वर्षात तिसऱ्यांदा या पुरस्कारात खंड पडला आहे. नाट्य पंढरी म्हणून सांगलीची ओळख, आद्य नाटककार विष्णूदास भावेंचा जन्म आणि कर्मभूमी असणाऱ्या सांगलीमध्ये मराठी रंगभूमीवरील मानाचा पुरस्कार विष्णूदास भावे यांच्या नावाने दिला जातो. 1959 साली या पुरस्काराला सुरुवात झाली.
मराठी रंगभूमीवरील उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कलाकारांना हा मानाचा पुरस्कार दिला जातो. 5 नोव्हेंबर रंगभूमी दिन नाटय पंढरी सांगलीमध्ये अखिल भारतीय नाट्य संमेलन अध्यक्षांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्याची परंपरा आहे. रोख 25 हजार रुपये, सोन्याचा मुलामा दिलेले पदक असे पुरस्काराचे स्वरुप असते. पण त्याहीपेक्षा हा पुरस्कार मिळणे रंगभूमीवरील कलाकारांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारं आहे. आतापर्यंत बालगंधर्व, प्र.के.अत्रे, पु.ल.देशपांडे, ज्योत्स्ना भोळे, हिराबाई बडोदेकर, शिलेदार कुटुंबिय, दिलीप प्रभाळकर, निळू फुले, मोहन जोशी, विक्रम गोखले, मोहन आगाशे, जब्बार पटेल, सुधा करमरकर, प्रभाकर पणशीकर, रोहिणी हट्टंगडी असे कितीतरी दिगग्ज कलावंत या पुरस्कार पदकानं गौरवली गेली आहेत. मात्र यंदा कोरोनामुळे या पुरस्कार सोहळ्यात खंड पडला आहे.
दरवर्षी देण्यात येणारा पुरस्कार अद्याप जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे यंदा 5 नोव्हेंबर रंगभूमी पुरस्कार सोहळा पार पडणार नसल्याचे नाट्य परिषद सांगलीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 61 वर्षापासून सुरू असलेल्या या परंपरेमध्ये हा तिसऱ्यांदा खंड पडला आहे. याआधी दोन वेळा हा पुरस्कार रद्द करण्यात आला होता आणि यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्यांदा हा पुरस्कार रद्द झाला आहे.