राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री शेफाली शहाने नेहमीच तगड्या भूमिका पेश करीत प्रेक्षकांचा आदर संपादन केला. आता ती अभिनयासोबतच दिग्दर्शनातही उतरली आहे. काही महिन्यांपूर्वी शेफालीने ‘सम डे’ हा लघुपट दिग्दर्शित केला होता आता ती तिचे लेखन आणि दिग्दर्शन असलेला दुसरा लघुपट घेऊन आलीय, ‘हॅप्पी बर्थडे मम्मीजी’. सनशाईन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित या चित्रपटाची प्रस्तुती केलीय रॉयल स्टॅग बॅरेल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्सने.
एक अतिशय मायाळू आई म्हणून, एक प्रेमळ पत्नी म्हणून, एक कर्तव्यदक्ष सून म्हणून केलेली निवड तिने आयुष्यभरासाठी आनंदाने स्वीकारलेली असते. परंतु कोरोना महामारीच्या साथीच्या आजारामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे तिला अचानक तिच्या प्रियजनांपासून दूर राहावे लागते. या गोंधळजनक परिस्थितीमध्ये, तिलाच स्वतःचे आश्चर्य वाटते कारण तिला एका अशा व्यक्तीचा पुनश्च शोध लागतो, जिच्या पासून ती सर्वाधिक काळ दूर राहिली आहे, ती स्वतः आणि अनपेक्षितपणे तिचे स्वत:सोबतच प्रेमसंबंध जुळतात. समाजातील चुकीच्या अपेक्षांच्या जडणघडणीमुळे, स्त्री लग्नानंतरच्या आयुष्यात सामोरे जात असलेल्या अपरिमित भावनांना हा चित्रपट अचूकपणे चित्रित करतो. या उत्कृष्ट कलाकृतीच्या माध्यमातून शेफाली शाह यांनी सुंदरपणे हे दाखवून दिले की, वर्षानुवर्ष दुर्लक्षित भावना जेव्हा अचानक समोर येतात तेव्हा त्या कशाप्रकारे एखाद्या व्यक्तीस जीवनाच्या अनोळखी प्रवासावर घेऊन जातात.
![Shefali Shah](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-royal-stag-shefali-shah-happy-birthday-mummyji-mhc10001_24072021014620_2407f_1627071380_1091.jpeg)
शेफालीचे दिग्दर्शनीय दुसरे फुल आहे ‘हॅपी बर्थडे मम्मीजी’ तसेच तिने यात अभिनय केलाय. यातील कथेत त्यांनी अशा स्त्रीची भूमिका साकारली आहे जी तिच्या नात्यांमुळे स्वतःला ओळखले जावे हा पर्याय ती निवडते. मात्र एका अभूतपूर्व परिस्थितीमुळे गोंधळलेली स्थिती निर्माण होऊन तिला ‘स्व’ चा शोध लागतो. स्वतःचे मूल्य ओळखायला लावणारी ‘हॅपी बर्थडे मम्मीजी’ हा एक उत्तम लघुपट आहे, ज्यात कोरोना काळातील आजारपणांमुळे प्रेरित केलेले विलगीकरण अनेकांसाठी कसे वरदान ठरले आहे ते अलगदपणे दर्शविले आहे.
‘हॅपी बर्थडे मम्मीजी’ विषयी बोलताना शेफाली शहा म्हणाली, “‘हॅपी बर्थडे मम्मीजी’ ही कहाणी आहे आत्मसाक्षात्कार, आत्म-स्वीकृती आणि ‘माझी वेळ’ यांची, ज्याची आपल्या सर्वांना आस आहे. ही माझी कहाणी आहे तितकीच ती इतर कोणाचीही असू शकते. कुणी कल्पना करू शकतो त्यापेक्षाही अधिक सापेक्ष. त्याचमुळे माझ्यासाठी ही माझ्या प्रेक्षकांना सांगण्याची महत्त्वाची कहाणी आहे. टाळेबंदी दरम्यान मला सर्व जबाबदाऱ्या सोडण्याची प्रकर्षाने गरज वाटली आहे आणि मला खात्री आहे की प्रत्येकाला कधी ना कधीतरी असाच अनुभव आला असेल.”
हा लघुपट का बनविला याबद्दल विचारले असता शेफाली म्हणाली, “खरंतर या कठीण काळात माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते आणि त्याला वाट मोकळी करून देण्यासाठी मी हा पर्याय निवडला. कोविडमुळे आलेल्या टाळेबंदीने आमच्या मनात विलगतेची तीव्र भावना बिंबवली, परंतु त्यास वेगळ्या पद्धतीने घेतलं तर काय? विलगीकरणाचा अर्थ जर एकाकी राहणे असा नाहीये तर काय? जर कधीतरी एखाद्या वेळी आपल्या प्रिय व्यक्तींपासून आणि आपण निर्माण केलेल्या नात्यांपासून आपल्याला खरोखरंच अंतर आवश्यक असेल तर काय? आणि जरी हे नकळत किंवा अनपेक्षितपणे आले तरीही ते जे काही आहे ते तुम्हाला स्वतःला ओळखायला लावत असेल आणि अधिक चांगले बनवीत असेल तर काय? याचे उत्तर प्रेक्षकच उत्तमरीत्या देऊ शकतील. प्रत्येकजण चित्रपटापासून जे काही घेईल ती त्यांची स्वतःची निवड आहे.”
२०१७ मध्ये रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्सने शेफाली शहा हिची प्रमुख भूमिका असलेला समीक्षकांकडून प्रशंसा लाभलेला ‘ज्यूस’ हा लघुपट प्रदर्शित केला. फिल्मफेअरद्वारा कल्पित साहित्य श्रेणीत या चित्रपटाला ‘बेस्ट शॉर्ट फिल्म’ ('सर्वोत्कृष्ट लघुपट') पुरस्काराने गौरविण्यात आले व शेफाली ला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या पुरस्काराने. ‘हॅपी बर्थडे मम्मीजी’ हा शेफाली शहा हिचा या व्यासपीठासोबतच दुसरा सहयोग आहे.
हेही वाचा - बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांची विजयगाथा सांगणारा ‘बलोच'!