मुंबई - भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित हिंदी मालिका अँड टीव्हीवर सुरू होत आहे. 'एक महानायक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर' असे मालिकेचे शीर्षक असून मराठी कलावंत प्रसाद जावडे, नेहा जोशी आणि जगन्नाथ निवंगुणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
बालकलाकार आयुध भानूशाली यात लहानपणीच्या बाबासाहेबांची भूमिका साकारणार आहे, तर प्रसाद जावडे तरुणपणीचे बाबासाहेब साकारणार आहे. याबद्दल बोलताना प्रसाद म्हणाला, ''इतिहासकार आणि संशोधक हरी नरके या मालिकेसाठी आंबेडकरांच्या मालिकेसाठी तज्ज्ञ म्हणून काम करत आहेत. शांती भूषण यांनी लिहिलेली ही मालिकेचे दिग्दर्शन इम्तियाज पंजाबी करत आहेत.''
भूषण यांच्या मते आपल्याला जे इतिहासातून शिकवले त्याहून कितीतरी गोष्टी आंबेडकरांच्याबद्दल सांगायच्या आहेत. या कथेतून लोकांना प्रेरणा मिळेल असेही ते म्हणाले. ''ते आपल्या देशाचे महान नेते होते. त्यांना केवळ ब्रिटीशांकडून स्वातंत्र्य अपेक्षित नव्हते, तर समाजात बदल घडावा असे वाटत होते.'', असे शांती भूषण यांनी सांगितले.
अभिनेता जगन्नाथ निवंगुणे म्हणाले, ''मी आंबेडकरांच्या वडिलांची भूमिका करीत आहे. मी मराठी नाटक आणि मालिकांच्यामध्ये पूर्वी काम केलंय. ही माझी पहिलीच हिंदी मालिका आहे.''
या मालिकेतील अभिनेत्री नेहा जोशी म्हणाली, ''मी आंबेडकरांच्या आईची भूमिका साकारत आहे. ही एक मोठी जबाबदारी आहे. आजच्या पालकांना ही व्यक्तीरेखा प्रेरणा देईल अशी मी आशा करते.''
स्मृती शिंदे निर्मित 'एक महानायक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर' ही मालिका &TV वर प्रदर्शित होणार आहे.