हैदराबाद - राजकीय समारंभ, सोहळे, लग्न समारंभ फार गर्दीमध्ये कोणत्याही समस्येविना सुरू असतात. मात्र, आमच्यासारख्या कलावंतांना खूप निर्बंध असतात. 50 टक्के प्रेक्षकांमध्ये काम करावं, हे निर्बंध विनोदी आहेत, असं माझं मत आहे. कारण नाटकाला येणारा प्रेक्षक, चित्रपटाला येणारा प्रेक्षक कलाकाराला भेटत नाही. पण असं म्हणतात की, तुम्ही इतका वेळ एसीमध्ये बसतात, तेव्हा तो कोरोना होऊ शकतो. तर मग विमानात बसलेल्या लोकांना कोरोना होऊ शकतो ना. त्यामुळे सोयीस्कर रीतीने हे मांडलं गेलंय की कोणी काम करायचं आणि कोणी नाही, असे मत दिग्दर्शक केदार शिंदे ( Director Kedar Shinde on Corona Guidelines ) यांनी व्यक्त केलं. प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक, अभिनेता अशी ज्यांची ओळख आहे ते म्हणजे मराठीतील नामवंत दिग्दर्शकांपैकी एक केदार शिंदे. केदार शिंदे हे दिंवगत शाहीर कृष्णराव साबळे यांचे नातू आहेत. केदार शिंदे यांनी श्रीमंत दामोदर पंत, अगं बाई अरेच्चा, इराद पक्का, बकुळा नामदेव घोटाळे, जत्रा यासारख्या चित्रपटांचं तर सही रे सही, पुन्हा सही रे सही, तूतू मीमी, श्रीमंत दामोदर पंत या मराठी नाटकाचं, इतकंच नव्हे तर एका हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ईटीव्ही भारतने त्यांच्या वाढदिवसाच्या (16 जानेवारी) निमित्ताने त्यांच्याशी विशेष संवाद साधला. ( Director Kedar Shinde Special Interview with ETV Bharat )
- प्रश्न - सर सध्या कोणत्या प्रोजक्टवर काम सुरुंय?
उत्तर - सध्या मिनी लॉकडाऊन सुरू आहे. माझ्या आयुष्यातील लॉकडाऊन 2020 साली सुरू झाला. जेव्हा जेव्हा नवीन प्रोजक्ट हाती घेतले जातो. तो सुरू होणार असतो, तेव्हाच कोरोनाचं संकट समोर येतं. यानंतर राजकीय स्तरावरुन आपल्यावर निर्बंध घातले जातात आणि मी फक्त एक सामान्य नागरिक म्हणून त्याकडे हताशपणे बघतो. 100 टक्के स्वत:ची काळजी घेतोय. कोरोना नाही असं माझं म्हणणं नाही. पण त्याचा अवडंबर फक्त मनोरंजन क्षेत्रापुरतं का? हे मला कळलेलं नाहीये. कारण राजकीय समारंभ, सोहळे, लग्न समारंभ फार गर्दीमध्ये कोणत्याही समस्येविना सुरू असतात. मात्र, आमच्यासारख्या कलावंतांना खूप निर्बंध असतात. 50 टक्के प्रेक्षकांमध्ये काम करावं, हे निर्बंध विनोदी आहेत, असं माझं मत आहे. कारण नाटकाला येणारा प्रेक्षक, चित्रपटाला येणारा प्रेक्षक कलाकाराला भेटत नाही. पण असं म्हणतात की, तुम्ही इतका वेळ एसीमध्ये बसतात, तेव्हा तो कोरोना होऊ शकतो. तर मग विमानात बसलेल्या लोकांना कोरोना होऊ शकतो ना. त्यामुळे सोयीस्कर रीतीने हे मांडलं गेलंय की कोणी काम करायचं आणि कोणी नाही. त्यामुळे राजकीय लोकांसाठी आमचं क्षेत्रं हे शेवटचं येतंय. त्यांचे निर्बंध आम्ही सहन करतोय आणि हताशपणे बघतोय की, कधी या गोष्टी पूर्वपदावर येतील. मला असं वाटतं की, कोरोनाबाबत जे तज्ञ आहेत, ज्यांना याबाबत माहिती आहे, त्यांच्यापैकी किती लोकांचे पैसे या क्षेत्रात अडकले आहेत, याचा एकदा शोध करण्याची गरज आहे. ज्यांचे पैसे अडकतात ना त्यांना याची जाणीव असते. या क्षेत्रातील अभ्यासू (माहीर) लोक मग ती कोणत्याही पक्षातील असू देत त्यांना सरकारने जवळ घेतले तर ते लोक खरं सांगू शकतील की मनोरंजन क्षेत्रातील लोकांच्या अडचणी काय आहेत. ( Director Kedar Shinde To Government on Corona Guidelines )
- प्रश्न - वैमानिक होण्याचं स्वप्न, सैन्यदलात जाण्याचं स्वप्न पाहिलं. मात्र, आज तुम्ही मनोरंजन क्षेत्रात आलात, दिग्दर्शक झालात, याबद्दल सांगाल.
उत्तर - मला बालपणी वैमानिक व्हावंसं वाटत होतं. त्यासाठी एनसीसी सहभागी झालो होते. एससीसीचा प्रमुखही होतो. आठवीला माझा विचार होता की, सैन्यशाळेत जायचं आणि तिथून हवाईदलात जाऊन वैमानिक व्हायचं. पण 'गवयाचं पोर सुरातच रडतं' त्याप्रमाणे शाहीर साबळेंचा नातू असल्यामुळे त्या कालखंडात आमच्या महाराष्ट्राच्या लोकधारा या कार्यक्रमात काही मुलांची आवश्यकता होती. त्यामुळे सुट्टींच्या दिवसांमध्ये केदार तू काही प्रयोग कर, असं सांगितल्यामुळे यात मी कसा अडकत गेलो, ते माझं मला कळलं नाही. वैमानिक असतो तर विमान चालवलं असतं. आज दिग्दर्शक आहे तरीही विमानच चालवतोय. कारण मी पायलट सीटवरच बसलेलो असतो आणि मी सर्व कलावंत माझ्या मागेच असतात, मी ज्या पद्धतीने त्यांना घेऊन जाईन ते त्या पद्धतीनेच जातात.
- प्रश्न - सर, तुम्ही तुमच्या आजोबांवर म्हणजे शाहीर साबळेंवर चित्रपट करताय. महाराष्ट्र शाहीर, हे या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाच्या अनुभवाबद्दल आणि हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार बद्दल सांगाल.
उत्तर - महाराष्ट्र शाहीर हे नाव असलं तरीही हा चित्रपट काही शाहीर साबळेंवरील डॉक्युमेंटरी नाही. हा सिनेमा अडीच तासांचा आहे. कालखंड 1923 ते 1984 यादरम्यानचा आहे. त्यांच्याशी माझं घरघुती नातं होतंच. मात्र, त्यांच्या गोष्टी काही Script करत होतो, त्या वाचताना मला जाणवायला लागलं, की या माणसानं काय-काय या महाराष्ट्रासाठी केलंय, हे लोकांसमोर आलंय. हे फक्त महाराष्ट्राची लोकधारा करणारे शाहीर नाहीत, फक्त जय जय महाराष्ट्र माझा म्हणणारे शाहीर नाहीत तर त्यांनी या महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय या सगळ्या क्षेत्रामध्ये आपलं योगदान खूप मोठ्या प्रमाणावर दिलं होतं. ते योगदान काय आहे, ते मी 'महाराष्ट्राचा शाहीर' या सिनेमाच्या माध्यमातून समोर आणण्याचा प्रयत्न करतोय. हा सिनेमा 2023मध्ये येईल. कारण या 3 सप्टेंबरपासून त्यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होतंय. त्यामुळे 2022 ते 2023 या काळात तो येईल. तो काळ उभा करण्यासाठी थोडा कठीण आहे. माझ्या स्वत:साठी ही चित्रपट Milestone चित्रपट असेल. मी आजपर्यंत जितके सिनेमे केलेत त्याच्यापेक्षा ही माझ्यासाठी फार महत्त्वाची फिल्म आहे. यानिमित्ताने आजोबांनी मला जे शिकवलं त्याचा उतराई होण्याचा प्रयत्न करेन. ( Director Kedar Shinde on Shahir Sable Movie )
हेही वाचा - Birthday Celebrity Actress Nivedita Saraf : नवीन कलाकारांमध्ये फार प्रतिभा - अभिनेत्री निवेदिता सराफ
- प्रश्न - तुम्ही एका ठिकाणी म्हणाला होतात, तुमच्या आवडीचं लेखन करण्यासाठी कोणतंही गजबजलेलं ठिकाण चालतं. अशा परिस्थितीत तुम्ही Concentrate कसं करतात?
उत्तर - तुमचा मेंदू स्थिर असला पाहिजे. तुम्हाला मेंदू, तुमचा मन आणि तुमचा हात एका रेषेत असला पाहिजे. डोळ्यांना काय दिसंतय किंवा कानांना काय ऐकू येतंय यापेक्षा, जसं उदा. अर्जुनाला फक्त पक्षाचा डोळाच दिसला होता. मग माझं असं मत आहे की, तो पण गजबजलेला सभामंडप होता. मग इतकं सगळं असताना त्याला पक्षाचा डोळाच कसा दिसला. त्यामुळे जी गोष्ट करू ती एकदम फोकस आणि एकाग्रतेने करू. त्यामुळे लिखाणासाठी गजबजलेलं वातावरणंही चालतं आणि शांतताही चालते. फक्त जी गोष्ट मी लिहितो त्याची सुरुवात, मध्य आणि शेवट हा पूर्णपणे मला माहिती असायला पाहिजे. त्याशिवाय माझ्याकडून लिहून होत नाही. जबाबदाऱ्या वाढल्यामुळे थोडं लिखाण आता कमी व्हायला लागलं आहे.
- प्रश्न - तुमचा आवडता अभिनेता म्हणून तुम्ही नसिरुद्दीन शाह यांचं नाव घेतात. का?
उत्तर - नसिरुद्दीन शाह असंच नाही तर दिलीप प्रभावळकर, भरत जाधवही आवडतात. मला प्रत्येक चांगलं काम करणारा कलाकार आवडतो. उरीमधील विकी कौशलही आवडला होता. मला दिग्दर्शकांमध्ये Steven spielberg आवडतो. पण मला राजकुमार हिरानी, राजकुमार संतोषीपण आवडतात. असं काही एकाच व्यक्तीला धरून मी विचार करत नाही. नसिरजी फार फोकस होऊन काम करतात. त्यांनी Wednesday जो चित्रपट केला त्या चित्रपटांच्या शेवटचा सीन त्यांनी ज्यापद्धतीने सादर केला ते पाहून असं वाटतं की एक सच्चा कलावंतच असं करू शकतो. मला बच्चन साहेबही आवडतात. इतकी वर्ष त्यांचं करीअर आहे. किती मन लावून, समरस होऊन हा माणूस काम करतो, किती शिस्तबद्ध आहे, हे त्यांच्याकडे पाहून वाटतं. मला चांगलं काम करणारी माणसं आवडतात. ( Director Kedar Shinde on Nasiruddin Shah )
- प्रश्न - हिंदी चित्रपट 'तोह बात पक्की' हा 2010 मध्ये दिग्दर्शित झाला. यानंतर तुम्ही हिंदी चित्रपटांचं दिग्दर्शन तुम्ही केलं नाही. असं का?
उत्तर - कुणी घेतलं नाही. आणि मला असं वाटतं की त्यात गुंतून राहण्यात अर्थ नाही. आपलं करीअर काही संपलं नाही. मी आज 49 वर्षांचा आहे. आणखी पाच वर्षांनी मी चांगला हिंदी चित्रपट करेन आणि मग तुम्हीच मला विचाराल की बरेच दिवस तुम्ही मराठी चित्रपट का नाही केला? माझं म्हणणं आहे की, जी गोष्ट माझ्याकडे येते ती गोष्ट किती महत्त्वाची मानतो हे महत्त्वाचं. ती किती मन लावून करतो हे महत्त्वाचं. जसं मी हिंदी सिनेमा केला. तसं मी हिंदी नाटकंही करतो, हे फार कमी लोकांना माहिती आहे. सुरुवातीचे दोन महिने जेव्हा सिरीयल्स दिसतात, 2017 पासून ते 2022 पर्यंत सहा-सात सिरीयल्स केल्यात की ज्या लोकांना माहिती आहेत, पण त्यांना हे माहिती नाही मी याचं दिग्दर्शन केलंय. स्टार भारतला क्या हाल मि. पांचाल ही माझी पहिली सिरीयल होती आणि शेवटची मी आता सोनी टीव्हीसाठी सरगम की साडेसाती नावाची सिरीयल केली. हिंदीमध्ये माझा टच अजिबात नाही, असं होत नाही. मी हिंदी नाटक करतो तसं हिंदी सिरीअलही करतो. हिंदी सिनेमाचं म्हणाल तर मला कुणी विचारलेलं नाही. आणि तसं कामही कुणी दिलेलं नाही. जर मला विचारलं तर मी नक्कीच हिंदी फिल्म करेन. ( Director Kedar Shinde on Hindi Film Direction )
- प्रश्न - सर, योग्य वयामध्ये तुम्हाला चांगले मित्र मिळणं फार आवश्यक असतं, असं तुम्ही म्हणतात. भरत जाधव, अंकुश चौधरी या तुमच्या मित्रांबद्दल, तुमच्या मैत्रीबद्दल सांगाल.
उत्तर - ते नसते तर कदाचित आज मी तुमच्यासोबत मुलाखत द्यायला नसतो. मला स्वत:ला असं वाटतं की आम्ही स्वत:चे मित्र आहोत, त्यापेक्षा आम्ही एकमेकांचे उत्तम टीकाकार आहोत. जर चुकीचं झालं तर आम्ही मनापासून एकमेकांना सांगतो, आम्ही मनापासून ती गोष्ट ऐकतो. आजही इतकी वर्ष झाली आमची मैत्री टिकून आहे, तर त्याला इतकंच कारण आहे. आम्ही कोणताच एकमेकांबद्दल स्वार्थी विचार केला नाही आहे. जास्तीत जास्त कामं मी भरत जाधवसोबत करत असलो तरीही खूप वर्षांपासूनची माझी मैत्री ही अंकुशबरोबर आहे. कारण अंकुश तीन वर्षाचा होता आणि मी तीन वर्षाचा होतो तेव्हापासून आम्ही मित्र आहोत. त्यामुळे जवळजवळ 46 वर्षे आमच्या मैत्रीला झालेत. भरत थोडा उशिरा आमच्या आयुष्यात आला. 1985 साली तो आला. पण माझे आणि अंकुशचे ऋणानूबंध आधीचे आहेत. त्यांच्या मैत्रीबद्दल सर्वांना माहिती आहे. मी नशीबवान आहे, माझ्या आयुष्यात ते दोघं आहेत. ( Director Kedar Shinde on Bharat Jadhav & Ankush Chaudhari )