मुंबई - कोरोना काळात अनेकजण नैराश्याचे शिकार झाले. घरीच बंदिस्त राहिल्यामुळे होणाऱ्या चिडचिडीतून, आर्थिक समस्यांमुळे होणाऱ्या चिडचिडीतून, भविष्याच्या काळजीमुळे होणाऱ्या चिडचिडीतून निराशा पसरलेली होती. लॉकडाऊनमध्ये एक विनोदी कार्यक्रम लोकांना खळखळून हसवत आजूबाजूची निगेटिव्हिटी विसरण्यासाठी मदत करत होता तो म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'. नुकताच महाराष्ट्राची हास्यजत्राच्या टीमला ज्येष्ठ रंगकर्मी मुळ्येंचा ‘माझा पुरस्कार’ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.
विनोदामुळे सकारात्मकता
‘रोजच्या जगण्यातला विनोद हा निराशा दूर करून सकारात्मकता निर्माण करतो. कोविडनंतर दाटणारी निराशा दूर करण्याचे काम ‘हास्यजत्रा’ची टिम करत आहे. तुम्ही नेमक्या वेळी ज्या गोष्टीची जास्त गरज आहे, ते काम करत आहात’, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या ‘माझा पुरस्कार’ विजेत्यांचे कौतुक केले. सनदी लेखापाल परीक्षेत देशात गुणवत्ता यादीत स्थान पटकावणाऱ्या अभिजित ताम्हणकर यांचाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यास सोनी मराठी वाहिनीचे बिझनेस हेड अजय भाळवणकर, नॉन फिक्शन हेड अमित फाळके, निर्माता दिग्दर्शक प्रसाद ओक, अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्यासह हास्यजत्राच्या टिमधील वनिता खरात, दत्तात्रय मोरे, अमीर हडकर, चेतना भट, शिवाली परब, पृथ्वीक कांबळे, ओंकार राऊत, ओंकार भोजणे, पंढरीनाथ कांबळे आदी उपस्थित होते.
मनोरंजन क्षेत्रास पाठबळ देणार
‘यंत्राने आवाज करू नये. ते व्यवस्थित चालावे म्हणून आपण वंगण घालतो. त्याचप्रमाणे आपल्या रोजच्या जगण्यात विनोद हे वंगणाचे काम करते. विनोद निर्मितीचे मोठे काम विनोदी लेखक, कलाकार करतात. सातत्याने हसविणे हे कठीण काम असते. नवनवीन सुचत राहणे अवघड असते. पण हे मोठे काम हास्यजत्राची टीम करते आहे. चांगले काम करणारे कलावंत आणि मनोरंजन क्षेत्राला नेहमीच पाठबळ दिले जाईल, असेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले. कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते लेखक सचिन मोटे, निर्माता दिग्दर्शक सचिन गोस्वामी, लेखक-अभिनेते समीर चौगुले, लेखक-अभिनेते प्रसाद खांडेकर, विशाखा सुभेदार, गौरव मोरे, नम्रता संभेराव यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
हेही वाचा - सलमान खानसह ७ जणांवर कथित फसवणूक प्रकरणी समन्स