आयुष्यात विनोद असेल तर कोरोनामुळे पसरलेल्या नकारात्मकतेला छेद देता येतो. हास्यामुळे मन प्रसन्न होते आणि सकारात्मकता पसरून आपला मेंदू ताजातवाना होत असतो. यामुळेच टेलिव्हिजनवरील विनोदी कार्यक्रमांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढते आहे. असाच एक कार्यक्रम जो अनेक वर्षे, कोरोना काळाच्या खूप आधीपासून, प्रेक्षकांचे मनोरंजन करतोय तो म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’. झी मराठीवर ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमावर तमाम प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. सुरुवातीपासूनच या कार्यक्रमाला आणि त्यातील विनोदवीरांना महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण जगाने डोक्यावर उचलून धरलं.
शाहरुख खान, सलमान खान, अजय देवगण, माधुरी दीक्षित, दिवंगत श्रीदेवी आदी अनेक मोठमोठे कलाकार या मंचाला भेट देऊन गेले आहेत. वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील लोकं ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम आवडीने पाहतात. या संकट काळात प्रत्येकाला आपापल्या काळज्या आणि ताणतणाव आहेत, पण काही क्षणासाठी हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू उमटवतो. मराठी कलाकारच नाही तर हिंदी कलाकारांना देखील या मंचाची ओढ आहे.
झी टीव्हीवर आता एक नवीन पर्व सुरु होतंय, 'झी कॉमेडी फॅक्टरी'. हा कार्यक्रम सुरु होण्याच्या निमित्ताने हिंदी मनोरंजनसृष्टीतील अनेक नामांकितांनी ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर हजेरी लावली होती. यात होती बॉलिवूडची प्रसिद्ध कोरियोग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खान. तिला ‘थुक्रटवाडी’ चे आमंत्रण आल्यावर ती येण्यासाठी लागलीच तयार झाली. तिच्या सोबत आले होते डॉक्टर संकेत भोसले, सुगंधा मिश्रा, पुनीत पाठक आणि तेजस्वी प्रकाशजे त्यांच्या विनोदी ‘टायमिंग’ साठी प्रसिद्ध आहेत.
या सर्व कलाकारांच्या उपस्थितीत ‘चला हवा येऊ द्या’ च्या सर्व विनोदवीरांनी कल्ला केला आणि पाहुण्यांना पोट धरून हसण्यास भाग पाडले. त्यांचं जबरदस्त सादरीकरण पाहून या सर्व कलाकारांनी त्यांचं कौतुक केलं, ज्यात पुढे होती फराह खान. ती म्हणाली, “‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर मी पहिल्यांदाच आलेय आणि या कार्यक्रमात येऊन मला खूप छान वाटलं आणि भरपूर मजा आली. मराठी विनोदी कलाकारांचं कॉमिक टायमिंग हे कमाल असतं आणि हा त्यांचा गुणधर्म आहे असं मला वाटतं. इकडे येऊन वेळ कसा गेला कळलंच नाही." ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर ‘झी कॉमेडी फॅक्टरी’ कार्यक्रमातील कलाकारांनी केलेली धमाल बघणे ही प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे.
हेही वाचा - राज कुंद्राच्या घरी पोलिसांची सलग पाच तास चौकशी, शिल्पाचाही नोंदवला जबाब