मुंबई - मोठा पडदा असो वा छोटा पडदा, सध्या जीवनपटांना चांगले दिवस आल्याचे दिसत आहे. तसं बघायला गेलं तर बायोपिक बनविणे फार जिकिरीचे काम आहे परंतु अनेक निर्माते-दिग्दर्शक ती जबाबदारी उचलताना दिसताहेत. एण्ड टीव्हीवर सुरु असलेली 'एक महानायक डॉ. बी. आर. आम्बेडकर' ही मालिका बाबासाहेब आंबेडकर यांचा लहानपणीपासूनचा जीवनपट उलगडून दाखवताना दिसतेय.
'एक महानायक डॉ. बी. आर. आम्बेडकर' मध्ये नुकताच भीमाबाईंचा (नेहा जोशी) मृत्यू झाला व त्यामुळे भीमरावांच्या कुटुंबावर दु:खाचे सावट पसरले. रामजी (जगन्नाथ निवंगुणे) यांच्यावर एकट्यानेच त्यांच्या मुलांची काळजी घेण्याची अतिरिक्त जबाबदारी पडली आहे. मीराबाईची (फाल्गुनी दवे) त्यांचा दुसरा विवाह करण्याची इच्छा आहे. रामजी यांनी दुसरा विवाह करण्याला स्पष्टपणे नकार दिला असला तरी त्यांना समजले की दुसरा विवाह केल्यास त्यांच्या कुटुंबाला प्रबळ आधार मिळेल, तसेच विधवा महिलेला नवीन जीवन मिळेल. ते मुंबईमध्ये राहणारी विधवा महिला जिजाबाईसोबत विवाह करण्यास होकार देतात.
लवकरच, स्नेहा मंगल, या एण्ड टीव्हीच्या मालिकेमध्ये जिजाबाईची भूमिका साकारण्यासाठी प्रवेश करणार आहे. जिजाबाईच्या भूमिकेबाबत सांगताना स्नेहा मंगल म्हणाली, ''मला मालिका 'एक महानायक डॉ. बी. आर. आम्बेडकर'मध्ये जिजाबाईची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याने आनंद झाला आहे. जिजाबाई या रामजी सकपाळ यांच्या दुस-या पत्नी होत्या. त्या विधवा होत्या आणि मुंबईमध्ये त्यांच्या वडिलांसोबत राहत होत्या. विवाहानंतर त्या गोरेगावला स्थलांतरित झाल्या. हे स्थळ रामजी यांच्या कार्यस्थळापासून जवळ होते. त्या त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांच्यासोबत होत्या. जिजाबाईच्या प्रवेशासह रामजी व भीमराव यांच्या जीवनातील नवीन अध्याय पाहायला मिळेल. तसेच याचा कुटुंबावर काय परिणाम होईल, हे देखील आगामी एपिसोड्समध्ये पाहायला मिळेल.''
'एक महानायक डॉ. बी. आर. आम्बेडकर' ही मालिका दर सोमवार ते शुक्रवार रात्री ८.३० वाजता एण्ड टीव्हीवर प्रसारित होते.
हेही वाचा - ‘व्हॅलेंटाईन्स डे’ ला ‘गर्लफ्रेंड’ भेटायला येतेय शेमारू मराठीबाणावर!