छोट्या पडद्यावरील संकटात असणाऱ्या व्यक्तिरेखांच्या जीवनातील गुंत्यामुळे खऱ्या आयुष्यातील प्रॉब्लेम्स काही काळापुरते विसरायला होतात. हिंदीमधील ‘अनुपमा’ ज्याची मराठी आवृत्ती ‘आई कुठे काय करते’ मधील प्रमुख व्यक्तिरेखांवर होत असलेले जुलमी अत्याचार बघून मालिकेला प्रेक्षकांची सहानुभूती मिळतेय. खरंतर, ही मालिका टॉप ५ मध्ये असते आणि प्रेक्षकांची अत्यंत लाडकी आहे. आता मालिकेत अनोख्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी होताना दिसणार आहे. हा सण आपल्याला निसर्गाच्या जवळ जायला भाग पाडतो.

वडाचं झाड म्हणजे ऑक्सिजनचा पुरवठा करणारी निसर्गाची देणगीच. सध्याच्या घडीला आपल्या प्रत्येकालाच या ऑक्सिजनचं महत्त्व पटतं आहे. त्यामुळेच वटपौर्णिमेच्या सणादिवशी वडाच्या झाडाच्या पूजनाला मोठं महत्त्व आहे. वरुणराजाचं आगमन झालं की तमाम स्त्रियांना आतुरता असते ती वटपौर्णिमा सणाची. वडाची पूजा करुन पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणं हा या सणाचा महत्त्वाचा उद्देश. ‘आई कुठे काय करते’ मालिकेत वटपौर्णिमेचा सण साजरा झाला मात्र निराळ्या पद्धतीने. मालिकेच्या टीमने कुंडीतच वडाचं झाड लावून त्याची साग्रसंगीत पूजा केली.

‘आई कुठे काय करते’ मालिकेत अंकिताचीही पहिलीच वटपौर्णिमा आहे. त्यामुळे देशमुख कुटुंबात वटपौर्णिमेच्या सणाची लगबग पाहायला मिळेल. याशिवाय सध्या अनिरुद्ध आणि अरुंधतीच्या नात्यात तणाव असला तरी अनिरुद्धच्या निरोगी आयुष्यासाठी अरुंधती प्रार्थना करणार आहे. संजनासाठी अरुंधतीचं हे वागणं न पटणारं असलं तरी अरुंधती आपल्या मतावर ठाम असणार आहे. अरुंधती आपल्या कृतीतून नेहमीच नवा आदर्श डोळ्यासमोर ठेवत असते. त्यामुळे या वटपौर्णिमेच्या सणाच्या दिवशीही नवरा बायकोच्या नात्याचं खरं महत्त्व ती संजनाला पटवून देणार आहे. यानिमित्ताने प्रेक्षकांना देखील निसर्गाचं रक्षण करण्याचं आवाहन कलाकारांकडून करण्यात आलं.

‘आई कुठे काय करते’ ही मालिका स्टार प्रवाहवर प्रसारित होते.
हेही वाचा - ‘रॉकेट बॉईज'मधून उलगडणार होमी जे भाभा आणि विक्रम ए साराभाई यांचा जीवनपट!