प्रत्येक चित्रपट वा मालिकेमध्ये प्रेम असणे अनिवार्य असते. शक्यतो गुलाबी वा लाल रंग हा प्रेमाचा रंग म्हणून समजला जातो. परंतु झी मराठीवर एक नवीन मालिका सुरु होतेय, ‘मन झालं बाजिंद’. या मालिकेतील प्रेमाचा रंग आहे पिवळा. ते का हे मालिका पाहूनच कळेल असे या मालिकेची प्रेमी जोडीचे मत आहे. अभिनेता वैभव चव्हाण आणि अभिनेत्री श्वेता राजन हे दोघे पहिल्यांदाच मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांना भेटणार आहेत.
‘मन झालं बाजिंद’ या मालिकेची चर्चा सर्वत्र होतेय. मालिकेचे भन्नाट प्रोमोज आणि त्यातील रांगडा नायक आणि सुंदर नायिका यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्री श्वेता राजनने तिच्या भूमिकेविषयी सांगताना सांगितले की, ‘मी या मालिकेत कृष्णा ही व्यक्तिरेखा साकारतेय. कृष्णाचे आई वडील नाही आहेत, ती लहानाची मोठी मामा मामींकडे झाली आहे. तिच्या मामा मामींनी तिला अगदी फुलासारखं जपलंय. कृष्णावरचं प्रेम कमी होऊ नये म्हणून मामा मामींनी स्वतःच मूल देखील होऊ दिलं नाही, तिची सगळी स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मामा मामी झटत आहेत. कृष्णाला देखील परिस्थितीची जाणीव आहे. ती खूप समंजस आणि जबाबदार आहे. तिचं सीए बनायचं स्वप्न आहे. जरी परिस्थिती नसली तरी हि ती खूप मोठी स्वप्नं बघतेय. तिला खूप उच्च शिक्षण घ्यायचंय आणि मामा मामींवर असलेलं गरिबीचं ओझं तिला दूर करायचं आहे आणि त्यासाठी तिचे प्रयत्न चालू आहेत.’
खरंतर मालिकांमध्ये प्रेमाचा रंग गुलाबी असल्याचे दर्शविले जाते तसेच लाल गुलाबाची फुलंसुद्धा प्रेमात पसंत केली जातात. परंतु पहिल्यांदाच ‘मन झालं बाजिंद’ या मालिकेत राया आणि कृष्णाच्या प्रेमकथेत पिवळ्या रंगाची उधळण आपल्याला पहायला मिळणार आहे. बाजिंद हा शब्द सध्या ट्रेंडिंग आहे आणि श्वेताच्या मते बाजिंद म्हणजे निर्भीड, बाजिंद म्हणजे तो जो न घाबरता आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करतो.
अनोख्या विषयावरील मालिकेविषयी सांगताना श्वेता म्हणाली, ‘या मालिकेत प्रेमाचा रंग, गुलाबी नाही तर, पिवळा आहे. पिवळा या हा रंग बुद्धीचं, मांगल्याचं आणि समृद्धीचं प्रतीक आहे आणि आपल्या संस्कृतीमध्ये पिवळ्या रंगाच्या हळदीला खूप मान असतो. या मालिकेतील नायक राया याचा हळदीचा कारखाना आहे. त्याच्या कामाचा पसारा खूप मोठा आहे आणि राया स्वभावाने देखील प्रेमाची उधळण करणारा आहे. तो खऱ्या अर्थाने बाजिंद आहे. तसेच मामा मामींकडे राहणारी कृष्णा ही संयमी आणि सारासार विचार करून वागणारी आहे. या दोघांची एक प्रेम कहाणी बेधुंद बेभान अशी आहे.’
या मालिकेचे प्रोमोज रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये खूप चर्चा आहे. त्याबद्दल बोलताना ती म्हणाली, ‘प्रोमोज रिलीज झाल्यापासून आम्हाला खूप सारे मेसेजेस सोशल मीडियाद्वारे येत आहेत. सगळ्यांना प्रोमो आणि त्यातील बॅकग्राउंड म्युजिक देखील खूप आवडतंय त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष मालिकेकडे लागलं आहे. सगळेजण या मालिकेसाठी खूपच उत्सुक आहेत याचा मला खूप आनंद आहे. मी या मालिकेतून प्रेक्षकांना भेटण्यासाठी खूप उत्सुक आहे आणि मला खात्री आहे की प्रेक्षकांना देखील कृष्णा आणि रायाची बेभान प्रेमकहाणी नक्की आवडेल. त्यामुळे सगळ्यांनी आपल्या परिवारासोबत या मालिकेचा आनंद घ्यावा अशी विनंती मी प्रेक्षकांना करेन.’
हेही वाचा - दिग्दर्शक मधुर भांडाकरने घेतली नीरज चोप्रा आणि मीराबाई चानूची भेट, बायोपिकच्या चर्चेला उधाण