मुंबई - चित्रपटगृहे उघडली असली तरी सरकारच्या कडक नियमांमुळे व कोरोना ची भीती अजूनही न गेल्यामुळे सिनेमा बघायला म्हणावी तशी गर्दी होत नाहीये. तरीही काही चित्रपट प्रदर्शित होताहेत. असाच एक मोठा (दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीमधील खूप मोठा) चित्रपट ‘मास्टर’ या आठवड्यात प्रदर्शित झाला. साऊथचे दोन मोठे स्टार्स यामध्ये असून तो प्रामुख्याने ‘विजय विरुद्ध विजय’ अशी जुगलबंदी असलेला आहे. दक्षिणेकडील चित्रपट खूप ‘लाऊड’ असतात व ‘मास्टर’ त्यापेक्षा काही वेगळा नाही. नव्वदीच्या काळातील हिरो-पूजा-चित्रपट असायचे तसा ‘मास्टर’ आहे, सर्व मसाल्याचे जिन्नस वापरून बनविलेल्या एका डिशसारखा, जी बेचव नक्कीच नाही.
‘मास्टर’ सुरू होता भवानी (विजय सेथूपती) च्या लहानपणापासून. त्याला जबरदस्तीने बालसुधारगृहात पाठविले जाते व तिथले अत्याचार अंगवळणी पडून तो एक निर्दयी पट्टीचा गुन्हेगार बनतो. आपल्यावर झालेल्या अत्याचाराचा बदला म्हणून तो रस्त्यातल्या सर्वांचा काटा काढत जातो. बालसुधारगृहात अल्पवयीन मुलांच्या आड तो गुन्हे घडवत जातो व त्यांना नशेची लत लावून आपल्या फायद्यासाठी वापर करून घेत राहतो. दुसरीकडे एक कॉलेज प्राध्यापक जेडी (विजय), जो दारूच्या आहारी गेलेला असतो, विद्यार्थ्यांचा कैवारी बनून मॅनेजमेंटशी पंगा घेत असतो. आणि त्यामुळेच तो कॉलेज व्यवस्थापनाला नकोसा असतो. कॉलेजातील निवडणूक व्यवस्थापनाची जबाबदारी नीट पाडू न शकल्यामुळे त्याला शिक्षा म्हणून तीन महिन्यांसाठी बालसुधारगृहात मुलांना शिकविण्यासाठी पाठविण्यात येते. योगायोगाने ते बालसुधारगृह म्हणजे भवानीचा अट्टल गुन्हेगार घडविण्याचा अड्डा. तिथे असे काही घडते के जेडी आणि भवानी एकमेकांसमोर उभे ठाकतात. तत्पूर्वी अनेक प्रसंगांतून त्यांचा पाठशिवीचा खेळ चालतो. साहजिकच कोणाचा ‘विजय’ होणार हे कळण्यासाठी तुम्हाचा चित्रपट पाहावा लागेल.
कथानक दोन ओळींचे आहे व पटकथा चित्रपटाच्या दोन्ही ‘विजय’च्या फॅन्सना भावेल यारीतीने बांधली आहे. ती जरा पसरट झाली असून चित्रपटाची लांबी तब्बल तीन तास झाली आहे. संकलकानेसुद्धा कात्री चालविण्यात कुचराई केली आहे, हे नक्की. दिग्दर्शक लोकेश कनकराज याने दोन्ही ‘विजय’ ना सारखाच स्क्रीन टाइम देण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्वार्धाचा बराच भाग ‘भवानी’ ने व्यापला असून नंतर ‘जेडी धमाल करतो. विजयची एन्ट्री धमाकेदार असून त्याने विनोदपेरणी करीत आपली भूमिका इंटरेस्टिंग केली आहे. त्याने ॲक्शन तर उत्तम केली आहेच पण भावनिक प्रसंगांनाही न्याय दिला आहे. त्याच्या नृत्याचे अंग प्रभावीपणे वापरण्यात आले असून सामांन्यांनाही जमतील अशी कोरिओग्राफी ठेवलीय. विजय सेथूपतीने व्हिलनची भूमिका दरारा वाटेल इतपत चांगल्या पद्धतीने वठविली आहे. मालविका मोहनन, अर्जुन दास, अँड्रिया जेरेमीया, शंतनू भाग्यराज यांनी उत्तम साथ दिलीय. संगीत ठीकठाक असले तरी इंग्रजी गाणे (कोलावेरीची आठवण करून देणारे) छान झाले असून पार्श्वसंगीत उत्तम जमून आले आहे. चित्रपटातील ॲक्शन हा ‘हाय-पॉईंट’ असून खास दाक्षिणात्य स्टाइलच्या फाइट्स वेगवेगळ्या ठिकाणी घडतात. बस, रिक्षा, मेट्रो, एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन ई. ठिकाणांबरोबरच कबड्डी खेळतानाही फाइट्स दाखविल्या आहेत.
खरंतर संपूर्ण चित्रपट ‘हिरोगिरी’ ने व्यापला आहे आणि मनोरंजक मसालापट बनला आहे.