मुंबई - शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका असलेला कबीर सिंग चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट दाक्षिणात्य अर्जून रेड्डी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. कबीर सिंगच्या गाण्यांपासून ट्रेलरपर्यंत सर्वच चर्चेत राहिलं. शाहिदच्या या चित्रपटातील वेगळ्या भूमिकेमुळे प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतानाच आता प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली असून हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
चित्रपटाची कथा -
या चित्रपटात शाहिद कपूरनं एका टॉपर मेडिकल स्टूडंटची भूमिका साकारली आहे. पहिल्याच नजरेत कबीर म्हणजेच शाहिदला आपली ज्यूनिअर कियारा म्हणजेच प्रिती आवडायला लागते. यानंतर दोघांमध्ये प्रेम होतं. मात्र, त्यांच्या नात्याला प्रीतीच्या घरच्यांचा विरोध असतो आणि त्यामुळेच प्रीतीचं दुसऱ्या मुलासोबत लग्न लावण्यात येतं. प्रीतीच्या लग्नाची बातमी ऐकताच कबीरला धक्का बसतो आणि तो नशेच्या आहारी जातो. सततच्या नशेमुळे त्याचे वडिल त्याला घराबाहेर काढतात आणि इथून पुढे सुरू होते कबीरच्या संघर्षाची कथा. प्रीती आणि कबीरची लव्हस्टोरी सुरू होताच थांबते. यानंतर नशेमध्ये बुडालेल्या कबीर सिंगच्या आयुष्यात अनेक चढउतार येतात. मात्र, शेवटी या मेडिकल कॉलेजच्या लव्हस्टोरीला एक वेगळंच वळण येतं, हा ट्वीस्ट जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल.
दिग्दर्शन, संगीत आणि संवाद -
डायरेक्टर संदीप वंगा रेड्डी यांनी चित्रपट वास्तवादी वाटावा यासाठी कोणतीही कमी ठेवलेली नाही. मध्यांतराआधी चित्रपटात बरेच चढउतार आहेत. मध्यांतरानंतर हा चित्रपट चांगलाच भावूक करून जातो. गाण्यांबद्दल बोलायचं झाल्यास ही गाणी चित्रपटातील प्रत्येक परिस्थितीला साजेशी आहेत. तर संवाद मनोरंजन करणारे आणि तितकेच भावूक आहेत.
कलाकारांचा अभिनय -
शाहिदच्या एन्ट्रीपासून ते चित्रपटाच्या शेवटपर्यंत शाहिदचा अभिनय प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आहे. शाहिदच्या आतापर्यंतच्या फिल्मी करिअरमधील हा सर्वाधिक चांगला अभिनय असल्याचं चित्रपट व्यापार विश्लेषकांनी म्हटलं आहे. एक रागीट व्यक्ती, प्रियकर आणि नशेत बुडालेला तरूण अशी सर्वच पात्र त्यानं उत्तम पद्धतीनं साकारली आहेत. कियाराबद्दल बोलायचं झालं तर, तिचा रोल चित्रपटात कमी असला तरीही तिचं भोळेपण आणि स्टाईल प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारी आहे. तुम्ही जर शाहिदचे चाहते असाल तर त्याचा हा चित्रपट नक्कीच पाहावा.