मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याची धाकटी मुलगी योगिता गवळी आणि अभिनेता अक्षय वाघमारे यांचा विवाहसोहळा दगडी चाळीत पार पडला. सोशल डिस्टनसिंगचे सगळे नियम पाळून मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला.
अक्षय आणि योगिता यांचा विवाह 29 मार्च रोजी होणार होते. मात्र, देशभरात लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे हे लग्न देखील पुढे ढकलण्यात आले. अखेरीस शुक्रवारी मुंबई आणि पुणे पोलिसांच्या परवानगीने हा विवाह सोहळा पार पडला. नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी अरुण गवळी उपस्थित होते. आपल्या हाताने कन्यादान करून त्यांनी अक्षय आणि योगिता यांना भावी सहजीवनासाठी आशिर्वाद दिले. नववधू आणि वराने तोंडाला मास्क लावून लग्नाचे विधी पार पाडले. लग्नात आलेले पाहुण्यांना सॅनिटायझर देखील देण्यात आले होते. पोलिसांच्या देखरेखीखाली हा लग्न सोहळा पार पडला.
![मुलगी आणि जावयाला आशिर्वाद देताना अरुण गवळी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-01-dagadi-chawl-wedding-mhc10076_08052020204635_0805f_1588950995_739.jpg)
अक्षय हा मराठीतील सुपरस्टार दादा कोंडके यांचा नातेवाईक आहे. यापूर्वी 'बेधडक' 'दोस्तीगिरी' 'बस स्टॉप' 'फत्तेशिकस्त' या सिनेमांमध्ये त्याने काम केले आहे. योगिता ही सध्या महिलांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या एका सामाजिक संस्थेत काम करते याशिवाय काही सिनेमांची निर्मिती देखील तिने केली आहे.
अक्षय आणि योगिता हे गेल्या 5 वर्षापासून एकमेकांना ओळखत होते. त्यानंतर काही काळ डेट केल्यानंतर गेल्यावर्षी त्यांचा साखरपुडा पार पडला. आता लग्न जरी साधेपणाने केले असले तरी लॉकडाऊन संपल्यानंतर रिसेप्शन मात्र दणक्यात करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.