जिनिव्हा - लोकांमध्ये कोरोनासंबंधी जनजागृती व्हावी यासाठी जागतिक आरोग्य संघटना प्रयत्नशील आहे. यासाठीच आता डब्ल्यूएचओ, संयुक्त राष्ट्र फाऊंडेशन आणि इलुमिनेशन स्टु़डिओज एकत्र आले आहेत. हे सर्व एकत्रितपणे एक पब्लिक सर्विस अनाऊंसमेंट (पीएसए) करणार आहेत.
इलुमिनेशन हा स्टुडिओ अॅनिमेशन सिनेमे बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यांचे 'मिनियन्स' हे जगभरात प्रसिद्ध आहेत. यासोबतच, आता जागतिक आरोग्य संघटनेशी करार करणारा हा पहिला स्टुडिओ ठरला आहे. जगभरातील नागरिकांना कोरोनाबाबत जागरुक करण्यासाठी एक अॅनिमेटेड संदेश तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
याबाबत बोलताना जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस म्हटले, की या संकटाच्या वेळी आपण जगभरातील लोकांना आशेचा किरण दाखवणे आवश्यक आहे. यासोबतच त्यांना या विषाणूबाबत जागरुक करणेही तेवढेच गरजेचे आहे. जेणेकरुन ते इतरांनाही जागरुक करतील, आणि सर्व सुरक्षित राहतील. कोविड-१९शी लढताना फिजिकल डिस्टन्सिंग राखूनही एकमेकांच्या संपर्कात राहणे, आणि गरजेच्या वेळी एकमेकांची मदत करणे महत्वाचे आहे. हाच संदेश आता मिनियन्स आणि ग्रू ('डेस्पिकेबल मी' चित्रपटातील पात्रे) लोकांना देणार आहेत, असेही टेड्रोस म्हणाले.
या पात्रांना आवाज देण्यासाठी ऑस्कर विजेते अभिनेते स्टीव कॅरेल यांची निवड करण्यात आली आहे. इंग्रजीसोबतच स्पॅनिश, फ्रेंच, पोर्तुगीज, अरेबिक आणि इतरही काही भाषांमध्ये हा संदेश प्रसारित करण्यात येणार असल्याचेही टेड्रोस यांनी स्पष्ट केले.
तर, इलुमिनेशन स्टुडिओचे फाऊंडर आणि सीईओ ख्रिस मेलेडांड्री यांनी ही एक मोठी संधी असल्याचे म्हटले आहे. सकारात्मक सामाजिक बदल घडवण्यासाठी स्टोरीटेलिंग हे एक प्रभावी माध्यम आहे. अशाच प्रकारचा सकारात्मक संदेश जगभरातील लोकांना देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना आणि संयुक्त राष्ट्रांसोबत काम करणे हे अभिमानास्पद आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
हेही वाचा : लिम्का बुकने घेतली जमशेदपूरच्या 'पॅडमन'ची दखल, जाणून घ्या 'कोण आहे हा तरुण?'