मुंबई - हिंदी चित्रपटांप्रमाणेच मराठीमध्येही एकाच दिवशी दोन किंवा दोन पेक्षा अधिक चित्रपट प्रदर्शित होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, एकाच दिवशी जर दोन मोठे चित्रपट प्रदर्शित होत असतील, तर परस्पर सामंजस्याने एका चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जाते. ३१ जानेवारीला मराठीमध्ये 'विकून टाक', 'चोरीचा मामला' आणि इतर काही मोठे चित्रपट प्रदर्शित होणार होते. बॉक्स ऑफिसवर होणारी ही टक्कर टाळण्यासाठी 'विकून टाक' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली आहे.
आता 'विकून टाक' हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. या निर्णयाबद्दल बोलताना 'विकून टाक'चे निर्माते उत्तुंग ठाकूर म्हणाले, "'विकून टाक' सिनेमातून आम्ही प्रेक्षकांना हसवता हसवता सामाजिक संदेशही देणार आहोत. चित्रपट बनवताना संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेऊन त्यांच्या कल्पनेतला सिनेमा प्रत्यक्षात साकारण्यासाठी प्रयत्न करत असते. एकाच दिवशी मोठे सिनेमे प्रदर्शित झाल्यास त्या चित्रपटांच्या व्यवसायाला त्याचा फटका बसतो. अशावेळी प्रेक्षकांनाही प्रश्न पडतो, की कोणता चित्रपट पाहावा? त्यामुळे आमचा हा निर्णय सगळ्यांसाठीच योग्य आहे. चित्रपटसृष्टी ही एका परिवारासारखी आहे. आमच्या या निर्णयामुळे सर्व चित्रपटांच्या निर्मात्यांना आणि पर्यायाने चित्रपटसृष्टीला त्याचा फायदा होईल."
हेही वाचा -शशांक केतकर 'गोष्ट एका पैठणीची' मध्ये दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
'विकून टाक' या चित्रपटात शिवराज वायचळ, चंकी पांडे, रोहित माने, राधा सागर, ऋतुजा देशमुख, समीर चौगुले, हृषीकेश जोशी, वर्षा दांदळे, जयवंत वाडकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बॉलिवूड अभिनेते चंकी पांडे यांचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.
विवा इनएन प्रॉडक्शन, उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित आणि समीर पाटील दिग्दर्शित'विकून टाक' या चित्रपटाला अमितराज यांनी संगीतबद्ध केले असून गुरु ठाकूर यांनी गीतकार म्हणून काम पाहिले आहेत.
चित्रपटाचे क्रिएटिव्ह कन्सल्टंट राजेंद्र वनमाळी असून सिद्धेश्वर एकांबे यांची कथा आणि चारुदत्त भागवत, समीर पाटील यांनी या सिनेमाची पटकथा लिहिली आहे.
हेही वाचा -नेटीझन्सच्या मते, 'थप्पड'चा ट्रेलर म्हणजे 'कबीर सिंग'च्या दिग्दर्शकाला लगावलेली कानफडीत