जंगलाजवळील गावांमध्ये हिंस्त्र श्वापदे दिसणे नित्याचे असते परंतु मुंबईसारख्या दाटीवाटीच्या शहरातही कधीकधी ते आढळून येतात. शहरी भागांमध्ये बिबट्याचा वावर, अशा बातम्याही वाचायला मिळतात. अशाच एका बिबट्याची कहाणी ‘बिबट्या’ या चित्रपटातून प्रेक्षकांना दिसेल. बिबट्या म्हटलं की अनेकांच्या मनात धडकी भरते. या नावाशी अनेकांचे वेगवेगळे अनुभव, भावना, कथा जोडलेल्या आहेत. याच नावाचा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर 'बिबट्या' या सिनेमाच्या पहिल्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. चित्रपटाच्या पोस्टरवरून प्रकाशाने झगमगलेले शहर दिसत आहे व लांब कुठल्यातरी डोंगरावरून एका काळ्या आकृतीतील बिबट्या त्या शहराकडे बघताना दिसत आहे. या सिनेमाचे पोस्टर एक गूढता निर्माण करते. या सिनेमाची निर्मिती स्वयंभू प्रॅाडक्शनची असून या सिनेमाचे दिग्दर्शन चंद्रशेखर सांडवे यांनी केले आहे. बिबट्याच्या काळ्या आकृतीवरून बिबट्याचे भविष्य अंधारात आहे असे तर दिग्दर्शकाला सुचवायचे नसेल, ते आपणास चित्रपट पहिल्यावरच कळेल.
![Poster of Bibatya](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-bibtya-marathi-movie-poster-unveiled-mhc10001_14042021003223_1404f_1618340543_310.jpeg)
या सिनेमात अनुभवी कलाकारांची फौज दिसून येईल. विजय पाटकर, महेश कोकाटे, अनंत जोग, प्रमोद पवार, डॉ विलास उजवणे, अशोक कुलकर्णी, ज्ञानदा कदम, मनश्री पाठक, सचिन गवळी, सोमनाथ तडवळकर, सुभोद पवार, चैत्राली डोंगरे, सुशांत मांडले आदी कलाकार ‘बिबट्या’ मध्ये आहेत. हे पोस्टर पाहून लोकांमध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या चित्रपटाची कथा चंद्रशेखर सांडवे यांची आहे तर पटकथा चंद्रशेखर सांडवे व आर. मौजे यांची असून या चित्रपटाचे संवाद कमलेश खंडाळे यांनी लिहले आहेत तर छायाचित्रिकरणाची धुरा गणेश पवार यांनी सांभाळली आहे.
पोस्टरवरील नाव देखील अगदी लक्षवेधक आहे. बिबट्याने आज येथे हल्ला केला, शहरात आज बिबट्या या ठिकाणी आढळला या व अश्या अनेक बातम्या आपण वारंवार ऐकतो. हा चित्रपट नक्की याच धाटणीवर आहे की कोणता नवीन विषय घेऊन तो लोकांसमोर येणार आहे हे लवकरच समजेल. शहरातील लोकांना बिबट्या हा एक हिंस्र प्राणी असून तो केवळ शहरात त्रास देण्यासाठीच येत असतो या पलीकडे काहीच माहिती नाही. तो आपल्या शहरात येत नसून आपण त्याच्या जंगलात शिरलो आहोत, हे ते पूर्णपणे विसरले आहेत.
‘बिबट्या’ चित्रपटाच्या पहिल्याच पोस्टरने प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचं वातावरण निर्माण केलंय एवढं नक्की.
हेही वाचा - सर्वांनी घरी राहून आंबेडकर जयंती साजरी करा, मराठी कलाकारांकडून आवाहन