मुंबई - अक्षय कुमार, विद्या बालन यांची मुख्य भूमिका असलेला 'भूल भुलैय्या' हा चित्रपट २००७ साली सुपरहिट झाला होता. आता या चित्रपटाच्या सिक्वेलची तयारी सुरू झाली आहे. कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणी या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. तसेच अभिनेत्री तब्बू देखील यामध्ये महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात 'भूल भुलैय्या' चित्रपटातील दोन गाण्यांना रिक्रियेट करण्यात येणार आहे.
'भूल भुलैय्या' चित्रपटातील 'हरे कृष्णा हरे राम' आणि 'आमी जे तोमार' ही गाणी सुपरहिट ठरली आहेत. 'आमी जे तोमार' या गाण्यात विद्या बालनचा डान्स तसेच तिचा हॉरर लुक प्रेक्षकांना आवडला होता. आता सिक्वेलमध्ये विद्याच्या या आयकॉनिक गाण्यात तब्बूची भूमिका पाहायला मिळणार आहे.
अद्याप चित्रपट निर्मात्यांनी याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, या गाण्याच्या रिक्रियेट व्हर्जनसाठी तब्बू उत्साही असल्याचे बोलले जात आहे.
या चित्रपटाचे शूटिंग राजस्थानच्या जयपूर येथे होणार आहे. येथे १० दिवसांचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर लखनऊमध्येही शूटिंग करण्यात येणार आहे.
एप्रिल महिन्यापर्यंत या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्यात येणार आहे. मुंबईच्या काही भागातही या चित्रपटाचे शूटिंग होणार आहे.
अनिस बझ्मी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर, भूषण कुमार या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल.