मुंबई - अभिनेता प्रसाद ओकच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'हिरकणी' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात 'हिरकणी'च्या भूमिकेत नक्की कोण असणार, याचा उलगडा झाला आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही 'हिरकणी'च्या भूमिकेत झळकणार आहे. तर, अभिनेता अमित खेडेकर हा 'जिवा'च्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा रुपदर्शन सोहळा नुकत्याच पुण्यातील चतृशृंगी देवीच्या मंदिरात पार पडला. या चित्रपटाचं पहिलं मोशन पोस्टर आणि दोन्ही कलाकारांचाही लूक समोर आला आहे.
या कार्यक्रमासाठी खास पुणेरी ढोलपथकाला आमंत्रित करण्यात आलं होतं. 'जिवा'च्या भूमिकेतील अमितची एन्ट्री थेट घोड्यावरून, तर 'हिरकणी' बनलेल्या सोनालीची एन्ट्री थेट पालखीतून करण्यात आली. अभिनेता प्रसाद ओकने या दोघांची ओळख करून दिली. यावेळी सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता आणि तो म्हणजे सोनालीची निवड या भूमिकेसाठी नक्की कशी झाली. याबाबत प्रसाद आणि सोनालीने 'ई टीव्ही भारत'शी खास संवाद साधला.
साधारण ३ वर्षांपूर्वी लेखक प्रशांत गंगावणे हे सोनालीकडे हिरकणी या सिनेमाची कथा घेऊन आले. त्यांनी फक्त चार पानांची कथा लिहून सोनालीला यावर फार सुंदर सिनेमा तयार होऊ शकतो असे सुचवले. मात्र, तो पडद्यावर आणायचा कसा आणि हे धाडस करणार कोण असा प्रश्न सोनालीला पडला. त्याचवेळी तिच्या डोक्यात प्रसादच नाव आलं. 'कच्चा लिंबू' या चित्रपटानंतर प्रसाद देखील चांगल्या विषयाच्या शोधात होता. हा विषय समोर आल्यावर त्याने लगेचच होकार दिला आणि चित्रपटाच्या कामाला सुरुवात झाली. या चित्रपटाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी निर्माते आणि क्रिएटिव्ह प्रोड्युसर राजेश मापुसकर हे या टीमशी जोडले गेले.
हेही वाचा- अक्षयनं लेक निताराला पोस्ट शेअर करत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
मात्र, त्यांना गोरी घारी सोनाली हिरकणीच्या भूमिकेत कशी वाटेल, असा प्रश्न सुरुवातीपासून पडला होता. एक दोनदा त्यांनी प्रसादला काही पर्याय सुचवूनही पाहिले. मात्र प्रसादने प्रत्येकवेळी हसून हा विषय टाळला. अखेर एक दिवस सोनालीने मापुसकर याना फोन केला आणि तुम्हाला भेटायच आहे असं सांगितलं. त्यांना भेटून सर मी एकदा लूक करून दाखवते मग तुम्ही बघा अस त्यांना सांगितलं. त्यानंतर सोनालीने मेकअप कॉस्च्युम सगळं धारण करून त्यांना दाखवलं तेव्हा कुठे ती 'हिरकणी' दिसू शकते यावर त्याचा विश्वास बसला.
हेही वाचा- मुंबई पोलिसांनी खास अंदाजात केलं अमिताभ बच्चन यांचं अभिनंदन, पाहा ट्विट
सोनाली आणि अमित या दोघांनी सिनेमातील भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. भाषेपासून ते देहबोलीपर्यत आणि शेणात हात घालून घर सारवणे, भाकऱ्या थापणे, चूल फुंकणे, अश्या अनेक गोष्टी सोनालीने मन लावून केल्या आहेत. हे सगळं पाहून आणि चित्रपटाचं पहिलं शेड्युल संपल्यावर प्रसादने येऊन मापुसकर याना सांगितलं, की सोनालीने हिरकणी अप्रतिम रित्या साकारली आहे. एवढी मेहनत घेऊन ती कुणीच साकारू शकलं नसतं, असंही सांगितलं.
हेही वाचा- 'त्या' मंजुळ आवाजाची प्रेक्षकांवर भूरळ,'ड्रीम गर्ल'चं बॉक्स ऑफिसवर शतक