मुंबई - उत्तम आरोग्य ही आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातील एक महत्त्वाची बाब आहे. अशात लॉकडाऊनमध्ये घरातच राहावं लागत असल्यानं अनेकांच्या फिटनेसवर परिणाम झालेला दिसत आहे. अर्थात, घरी राहूनही फिटनेसची काळजी घेण्याचा प्रयत्न अनेकजण करत आहेत. कलाकार मंडळीसुद्धा यात मागे नाहीत. 'झी युवा' वाहिनीवरील 'युवा डान्सिंग क्वीन' या स्पर्धेची परीक्षक सोनाली कुलकर्णी हिनंदेखील सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर प्रणितचं फेमस ३७ दिवस फिटनेस चॅलेंज स्वीकारलं होतं.
सोनाली सध्या होणारा नवरा कुणाल बेनोडेकरसोबत दुबईमध्ये राहात आहे. तिथेच तिनं हे फिटनेस चॅलेंज स्वीकारलं. ३७ दिवसांच्या या फिटनेस चॅलेंजच्या काळात तिनं व्हिडिओकॉलच्या माध्यमातून प्रणितच्या संपर्कात राहून नियमित डाएट आणि वर्कआऊट केलं. या काळात ती दिवसातून ४ तास वर्कआऊट करत होती. एवढंच नाही तर या दिवसांमध्ये तिनं साखरेचं सेवनसुद्धा बंद केलं होतं. या सर्व मेहनतीमध्ये कुणालसुद्धा सहभागी होता . दोघांनी जोडीनं मिळून प्रणितचं फिटनेस चॅलेंज पूर्ण केलं.
या अनोख्या चॅलेंजबद्दल सोनालीनं सांगितलं, युवा डान्सिंगचं शूट सुरु असताना मला प्रणितचा कॉल आला होता. मात्र, तेव्हा वेळेअभावी मला ते जमलं नाही. लॉकडाऊनमध्ये माझ्या वाढदिवसानिमित्त प्रणितनं हे चॅलेंज मला गिफ्ट केलं. रोज व्हिडिओकॉलच्या माध्यमातून प्रणितच्या संपर्कात राहाणं सोपं होतं. मी करत असलेलं वर्कआऊट योग्य आहे की नाही याकडे लक्ष देणं, योग्य त्या सूचना करणं, यासाठी आम्ही व्हिडिओ कॉलचा प्रभावी वापर केला. टेक्नॉलॉजीचा वापर करून फिट राहाण्याचा हा फंडा मला खूप आवडला. हा फिटनेस क्लास प्रणितच्या मार्गदर्शनाखाली मी पुढेही सुरु ठेवेल, असं सोनाली म्हणाली.