एस एस राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ने संपूर्ण देशाला वेड लावले होते. आता खास मराठी प्रेक्षकांसाठी बाहुबली मराठीमध्ये ‘बोलला’ आणि सर्वांना आपलेसे केले. इतकेच नव्हे तर त्या ‘मराठी बाहुबली’ ची गाणीही मराठीमध्येच असल्यामुळे प्रेक्षकांना खूप भावताहेत. ‘मराठी बाहुबली’ या चित्रपटाने मराठी भाषेचे शब्दवैभव व त्याची किमया प्रेक्षकांना दाखवून दिली. भाषेच्या रंजकतेमुळे मराठी बाहुबलीने प्रेक्षकांची मने जिंकली. अनेक नामवंत कलाकारांच्या साथीने ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीने बाहुबलीचे ‘मराठीकरण’ करताना त्याच्या सगळया बाजूंकड़े कटाक्षाने लक्ष दिलं. भाषा-संवाद, गीतसंगीत, पार्श्वसंगीत या सर्व बाबतीत भव्यता जपली, त्याचीच परिणीती म्हणजे ‘मराठी बाहुबली’ला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
चित्रपटातील गीतसंगीत हा देखील चित्रपटाचा महत्त्वपूर्ण भाग असतो. गायिका बेला शेंडे यांनी आपल्या मधाळ आवाजाने रसिक प्रेक्षकांना नेहमीच मंत्रमुग्ध केले आहे. ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीने आणलेल्या बाहुबली चित्रपटाच्या मराठी अवतारातही बेलाच्या आवाजाची जादुगिरी रसिकांना अनुभवायला मिळाली आहे. यातील दोन गाणी बेलाच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आली आहेत. त्यानिमित्ताने बेला ने ‘मराठी बाहुबली’ चित्रपटाच्या गीत संगीताची निर्मीती व त्याच्या सादरीकरणाचा अनुभव सांगितला आहे.
‘एखाद्या हिट चित्रपटातील तितकीच हिट असलेली गाणी ‘रिक्रिएट’ करणं तितकं सोपं नसतं. प्रेक्षकांच्या मनात आधीच्या गाण्याची चाल पक्की असते अशावेळी वेगळ्या भाषेत ते गाणं आणत त्याचा परिणाम जराही कमी होऊ न देण्याची जबाबदारी मोठी असते. ही जबाबदारी मराठी बाहुबलीचे गीतकार वैभव जोशी, मिलिंद जोशी व संगीतकार कौशल इनामदार यांनी लीलया पेलली त्यामुळेच गायकांना गाणं स्वरांच्या माध्यमातून आणणं सहज शक्य झालं. या मातब्बरांसोबत काम करणं हा कायमच आनंददायी अनुभव असल्याचं ती म्हणाली. शब्दसुरांच्या किमयेनेचे ‘मराठी बाहुबली’ चे सौंदर्य वाढले’, असे बेला शेंडे म्हणाली.
हेही वाचा - भेटा ‘रात्रीस खेळ चाले ३’मधील नवीन ‘शेवंता’ ला!