हल्लीच्या काळात समाज माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याच्या थोड्याफार प्रमाणात दुरुपयोग होत असला तरी त्याचे फायदे खूप आहेत. शाळा कॉलेज सोडल्यानंतर त्यावेळच्या मित्रमैत्रिणींचा संबंध तुटलेला होता, परंतु सोशल मीडियामुळे पुन्हा एकदा वर्गमित्रांशी जुळता येऊ लागले आहे. त्याचा आनंद नक्कीच आहे आणि जुन्या आठवणीत रमताना मोठ्या झालेल्या सर्वांची ‘बॅक टू स्कूल' ची भावना जागृत होत असणार.
शाळा हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. तो वर्ग, घंटानाद, शिक्षक शाळेबाबतच्या या आणि अशा अनेक गोष्टी आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या आठवणीत असतात. प्रत्येकाच्या मनात शाळेभोवतीच्या आठवणींचे छोटेसे विश्व उभे राहते. प्रत्येकाला त्या आठवणी फार प्रिय असतात. परत एकदा या आठवणींना उजाळा देणारा एक नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'बॅक टू स्कूल' असे या चित्रपटाचे नाव असून काही महिन्यांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा झाली होती. आता या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी ‘बॅक टू स्कूल’ आता सज्ज झाला आहे.
‘बॅक टू स्कूल’ या चित्रपटाची निर्मिती शुभांगी सतीश फुगे आणि सतिश महादु फुगे यांनी केली आहे. तर सहनिर्माता हनुमंत नाडेकर असून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुदर्शन रणदिवे, अमित बेंद्रे, अमृता पाटील, प्राची फुगे, अमृत झांबरे, किरण झांबरे, दिपक गडदे, सुरेखा पवार यांनी काम पहिले आहे. या चित्रपटाची पटकथा आणि लेखन अमित नंदकुमार बेंद्रे आणि सतीश महादू फुगे यांचे असून छायाचित्रणाची धुरा श्रीनिवास गायकवाड यांनी सांभाळली आहे.
सौरभ गोखले, निशिगंधा वाड, स्नेहा चव्हाण (विश्वासराव), सुरेश विश्वकर्मा, श्वेता पगार, आधिश पायगुडे, विपीन बोराटे, चंद्रकांत कुऱ्हाडे, सोमनाथ रसाळ, नितीन बनसोडे, अमृत झांबरे, अभिजित पटणे, रुपाली पाथरे, किरण झांबरे, डॉ परिणिता पावसकर, मोहिनी कुडेकर, श्वेता कामत, सुप्रिया मागाडे, यशा पाळणकर, भूमी दळी आणि ईशा आगरवाल आदी कलाकार या चित्रपटात असून या चित्रपटाचे दिग्दर्शन सतिश महादु फुगे यांनी केले आहे.
प्रत्येकाच्या शाळेच्या आठवणींची पोतडी उघडण्यासाठी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे ‘बॅक टू स्कूल’.
हेही वाचा - नादखुळा म्युझिकचे पहिले गाणे ‘आपली यारी', १२ तास, १० लाख व्ह्यूज!