मुंबई - अभिनेता शशांक केतकर 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. एका वेगळ्याच कामासाठी निर्माता अक्षय बर्दापूरकर यांची भेट घेण्यासाठी आलेल्या शशांकला चित्रपटाची संहिता ऐकण्याची संधी मिळाली आणि अपघाताने महत्त्वाची भूमिकाही मिळाली.
प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेच्शो फिल्म्स 'गोष्ट एका पैठणीची' निर्मिती करत आहेत. अक्षय बर्दापूरकर निर्माते आहेत. शंतनू रोडे यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी दिसणार आहेत.
'गोष्ट एका पैठणीची" हा चित्रपट मला अक्षरशः अपघातानं मिळाला. अक्षय बर्दापूरकर यांच्यासह वेगळ्याच कामासाठी मीटिंग ठरली होती. त्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. मात्र, काहीही माहीत नसताना मला चित्रपटाची संहिता ऐकण्यासाठी बोलवण्यात आलं आणि मीही जाऊन बसलो. संहितेचं वाचन झाल्यावर मला त्यात एका भूमिकासाठी विचारणा झाली. संहिता आवडल्यानं नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. या चित्रपटामुळे उत्तम संहिता, जाणकार दिग्दर्शक, दमदार स्टारकास्ट अशी संधी मिळाली आहे, असं शशांकनं सांगितलं.