मुंबई - शाहिद कपुरच्या आत्तापर्यंतच्या करिअरमधील सर्वाधिक ओपनिंग करणारा 'कबिर सिंग' चित्रपट प्रेक्षकांवर राज्य करत आहे. २१ जूनरोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची प्रचंड क्रेझ सध्या पाहायला मिळत आहे. यावर्षी पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करून बिगेस्ट ओपनर ठरलेल्या पाच चित्रपटांमध्ये 'कबिर सिंग'चा समावेश झाला आहे. आता तिसऱ्या दिवशीच्या कमाईचे आकडेदेखील समोर आले आहेत.
तब्बल ३१२३ स्क्रिन्सवर झळकलेल्या 'कबिर सिंग'ने तीनच दिवसात अर्धशतक पूर्ण केले आहे. तीनच दिवसात चित्रपटाची कमाई ६७.९२ कोटी इतकी झाली आहे. शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने २०.२१ कोटींची कमाई केली होती. अवघ्या दोन दिवसांत या चित्रपटाने ४२.९२ कोटींचा आकडा गाठला होता. तर, तिसऱ्या दिवशी देखील या चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली.
'कबीर सिंग'ला मिळत असलेला चाहत्यांचा प्रतिसाद पाहून शाहिद आणि कियारानेही सोशल मीडियावर आभार मानले आहेत.
हा चित्रपट दाक्षिणात्य 'अर्जून रेड्डी' सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. संदीप वांगा यांनीच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. प्रेक्षकांनी जर असाच प्रतिसाद चित्रपटाला दिला, तर लवकरच या चित्रपटाचीही १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री होईल, असा अंदाज समीक्षकांनी व्यक्त केला आहे.