मुंबई - ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांचा शनिवारी (१८ जानेवारी) दुपारी चारच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्या शबाना आझमी यांना कामोठे एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर त्यांना एमजीएम रुग्णालयातून हलवले असून मुंबईतील अंधेरीमध्ये असणाऱ्या कोकीलाबेन रुग्णालयात नेण्यात आले आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.
शुक्रवारी (१७ जानेवारी) जावेद अख्तर यांचा ७५ वा वाढदिवस साजरा झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमासाठी शबाना आझमी आणि जावेद अख्तर पुण्याच्या दिशेने निघाले होते. मात्र, त्यापूर्वीच हा अपघात झाला. या अपघातात कार चालक आणि शबाना आझमी हे जखमी झाले होते. सुदैवाने जावेद अख्तर यांना कोणत्याही प्रकारे दुखापत झाली नाही.
हेही वाचा - अभिनेत्री शबाना आझमींच्या कारचा अपघात, पुणे-मुंबई एक्सप्रेस-वेवर घडली दुर्घटना
शबाना आझमी यांच्या एम एच 2 सी झेड 5385 या क्रमांकाच्या कारने पुढे चाललेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली होती. महामार्ग पोलीस आणि शीघ्र कृती दलाने त्यांना उपचारार्थ कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात आणले होते.
खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटनेची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शबाना आझमी यांच्या नाक आणि तोंडाला मार लागला आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, ट्रक चालकाने दिलेल्या तक्रारीवरून खालापुरात शबाना आझमींचा चालक अमलेश कामत याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये लिहिले आहे की, "चालकाच्या वेगवान गतीमुळे कारने पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर चालत्या ट्रकला जोरदार धडक दिली आणि त्यामुळे हा अपघात झाला."