मुंबई - दिग्दर्शक अजय फणसेकर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेले बरेच मराठी चित्रपट हिट ठरले आहेत. 'रात्र आरंभ', 'एनकाऊंटर', 'यही है जिंदगी', 'एक होती वादी', 'रामचंद्र पुरुषोत्तम जोशी', 'चीटर' असे उत्तमोत्तम चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले आहेत. आता त्यांचा 'सीनियर सिटीझन' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.
पाठमोरी उभी असलेली सिनियर सिटिझन व्यक्ती आणि समोर दिसणारे तरूण असा हा फर्स्ट लूक आहे. या फर्स्ट लुकवरुन सिनियर सिटीझन आणि तरूण यांना एकत्र आणणारं काय रंजक कथानक या चित्रपटात असेल याचं कुतुहल निर्माण झालं आहे.
अभिनेता सुयोग गोऱ्हे, अमृता पवार, स्नेहा चव्हाण, श्रुती बोराडीया, किरण तांबे, अमोल जाधव, गौरीश शिपूरकर, हर्षल पवार आदी कलाकारांच्या या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत. तर, इतर काही महत्वपूर्ण कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.
हेही वाचा- बिहारच्या पूरग्रस्तांना अमिताभ यांनी केली ५१ लाखाची मदत
'ऊँ क्रिएशन्स'च्या माधुरी नागानंद, विजयकुमार नारंग यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. राजू सावला यांनी क्रिएटिव्ह प्रोड्यूसर, प्रमोद मोहिते कार्यकारी निर्माते, बी. लक्ष्मण यांनी छायांकन आणि राकेश कुडाळकर यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. तर, अभिजित नार्वेकर यांनी संगीत आणि नृत्य दिग्दर्शक म्हणून अमित बाईंगने काम पाहिले आहे.
अजय फणसेकर यांची दिग्दर्शक म्हणून आजवरची कामगिरी प्रयोगशील आणि लक्षणीय राहिली आहे. त्यामुळे 'सिनियर सिटिझन'मधून ते काय नवं सादर करतात, हे पहाणं महत्त्वाचं ठरेल.
हेही वाचा -'भूल भुलैय्या -२' चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात