पणजी - सध्या पणजी येथे 'ईफ्फी' महोत्सव सुरू आहे. अशा चित्रपट महोत्सवामुळे कलाविश्वातील विविध घडामोडी माहिती होतात. तसेच, नविन लोकांना बघण्याची, भेटण्याची संधी मिळते. त्याबरोबरच जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोनही अधिक विकसित होतो, असे मत अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले. 'ई - टीव्ही भारत'च्या प्रतिनीधीशी त्यांनी संवाद साधला.
रंगभूमी, मराठी हिंदी चित्रपटांबरोबर सयाजी शिंदे मागील काही वर्षे दाक्षिणात्य चित्रपटात आणि विशेषतः तेलगू चित्रपटात मोठ्या प्रमाणात अभिनय साकारताना दिसत आहे. तसेच गोव्यातील भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी प्रेक्षकांशीही संवाद साधला.
आपल्याला मराठी अथवा हिंदी चित्रपट रसिकांपेक्षा दक्षिणेकडील प्रेक्षकांनी अधिक स्वीकारले असे वाटतेय का? या विषयी बोलताना शिंदे म्हणाले, तिकडे अधिकाधिक चित्रपट केले म्हणून तसे वाटते. जशा प्रकारे नदी वाहते, तसा हा प्रकार आहे. तिकडे अधिक पसंत केल्यामुळे अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचलो. यात लवकरच तमीळ आणि तेलुगू भाषिक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ज्यामध्ये 'रुलर' या अँक्शनपटाचा समावेश आहे.
आपल्या आगामी नाटकाबाबत बोलताना ते म्हणाले, की 'अरविंद जगताप या लेखकावर माझा विश्वास आहे. त्यांनी आता नाटक लिहून दिले तर महिनाभरात रंगभूमीवर आणणार. परंतु, यावर्षी नाटक करणार हे निश्चित केले आहे.