मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने अल्पावधीतच मोठी लोकप्रियता मिळवली आहे. 'केदारनाथ' आणि 'सिंबा' या चित्रपटानंतर ती कार्तिक आर्यनसोबत 'लव्ह आज कल' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सैफ अली खानची मुलगी असल्यामुळे तिची इतर स्टारकिड्ससोबत तुलना केली जाते. याबाबत तिने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
साराच्या पूर्वी श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी हिने 'धडक' चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी चंकी पांडेची मुलगी अनन्या हिने 'स्टूडंट ऑफ द ईयर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. काही दिवसांपूर्वीच तिचा 'पती, पत्नी और वो' हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला आला. या दोघी साराच्या वयाच्याच आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत साराची तुलना करण्याबाबत तिने आपले मत स्पष्ट केले.
हेही वाचा -मुंबई मॅरेथॉन : टायगर श्रॉफ, राहुल बोस यांनी दिला फिटनेस मंत्र
अलिकडेच सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांनी 'लव्ह आज कल'च्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेली तिला जान्हवी आणि अनन्यासोबत होणाऱ्या तुलनेबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.
'जान्हवी आणि अनन्यासोबत माझी तुलना होणे, हे साहजिकच आहे. पण, त्या दोघी चांगल्या अभिनेत्री आहेत. त्या माझ्या चांगल्या मैत्रीणी आहेत. आमच्यात कोणतीही स्पर्धा नाही. आम्ही एकमेकांच्या कामाचा आदर करतो', असे ती म्हणाली.
हेही वाचा -'लव्ह आज कल': कोण आहे कार्तिकसोबत दिसलेली आरुषी शर्मा?
सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांची जोडी पहिल्यांदाच 'लव्ह आज कल' चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र दिसणार आहे. इम्तियाज अली यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. १४ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.