मुंबई - बॉलिवूडचे आघाडीचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळींचा आगामी 'मलाल' चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने जावेद जाफरींचा मुलगा मिजान जाफरी आणि संजय लीला भन्साळी यांच्या बहिणीची मुलगी शर्मिन सेहगल हे दोघेही बॉलिवूड पदार्पण करत आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. आता हा चित्रपट ५ जुलैला प्रदर्शित होणार आहे.
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाचं नवं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये मिजान आणि शरमिनचा नवा लूक पाहायला मिळतोय. हा चित्रपट सुरूवातीला २८ जूनला प्रदर्शित होणार होता. मात्र, २८ जूनला आणखी बरेचसे चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे 'मलाल'ची तारीख बदलण्यात आली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या ट्रेलरला सोशल मीडियावर चाहत्यांच्या चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. या चित्रपटातून दोन नवे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता पाहायला मिळते.
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सुरुवातीला नायक आणि नायिकेमध्ये असलेला वाद नंतर प्रेमात रुपांतरीत होतो. त्याला कशाप्रकारे राजकीय वळण मिळतं. याची झलक या पाहायला मिळते. प्रेमावर आधारित असलेल्या कथांमध्ये संजय लिला भन्साळी यांचा हातखंडा आहे. आता त्यांच्या इतर चित्रपटाप्रमाणे 'मलाल' चित्रपट देखील प्रेक्षकांना सिनेमागृहाकडे खेचून आणण्यात यशस्वी होतो का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.