मुंबई - लॉकडाउनमुळे अडकलेल्या स्थलांतरित गरीब मजुरांना घरी पोहोचवण्यासाठी बस, ट्रेन, विमानाची व्यवस्था अभिनेता सोनू सूद करत आहे. त्याच्या कामाचे देशभरात कौतुक होत आहे. कठीण काळात मजुरांच्या मदतीला धावून येणाऱ्या सोनूचे आभार मानण्यासाठी कलाकार निलेश चौहान याने स्टॅम्प पॅडच्या शिक्क्याचा वापर करत सोनूची आगळी वेगळी कलाकृती तयार केली आहे.
सध्या सोनू सुद त्याच्या कामामुळे सोशल मीडियावर हिट झाला आहे. त्याच्या कामाने सर्व भारतीयांची त्याने मने जिंकली आहेत. चित्रपटात जरी सोनू खलनायकाची भूमिका करत असला तरी खऱ्या जीवनात तो रिअल नायक बनला आहे. त्याच्या कामाला सलाम म्हणून निलेश याने हे शिक्का चित्र रेखाटले आहे.
''सोनू सूद खऱ्या जीवनातील नायक आहे. त्याच्या कामाने मी प्रभावित झालो आहे. त्याचे आभार मानण्यासाठी मी त्याची कलाकृती तयार करण्याचे ठरवले. यासाठी मी स्टॅम्प पॅड ची निवड केली. स्टॅम्प पॅडच्या शिक्क्यापासून मी त्याची ही कलाकृती तयार केली आहे. ही कलाकृती तयार करण्यासाठी मला 5 तासांचा वेळ लागला. स्टॅम्प पॅडपासून कलाकृती तयार करण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून मी त्याला ही कलाकृती पाठवली आहे. परंतू लवकरच मी त्याला स्वतः भेटून ही कलाकृती देणार आहे,'' असे निलेश यांनी सांगितले. निलेश हा पक्ष्यांच्या पिसापासून कलाकृती तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याने विविध कलाकृती आतपर्यत बनवल्या आहेत.