मुंबई - संगीतकार आणि गायक डॉ. सलील कुलकर्णी यांची गाणी कायम सदाबहार असतात. मात्र, गाण्याच्या पलिकडे जाऊन सलील यांनी दिग्दर्शनात पदार्पण केलं ते ‘वेडिंगचा शिनेमा’ या मराठी सिनेमातून. या सिनेमाची कथा आणि दिग्दर्शन सलील याचं होतं. या धमाकेदार मनोरंजनाचं पॅकेज असलेला सिनेमा दिल्यानंतर आता ते पुन्हा सज्ज झाले आहेत. 'एकदा काय झालं' हा चित्रपट घेऊन ते पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनाही या चित्रपटाची आतुरता आहे. अलिकडेच पुणे येथे सलील कुलकर्णी यांच्यासह चित्रपटात महत्वाच्या व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थित या चित्रपटाच्या शूटिंगचा मुहूर्त २६ डिसेंबरला पार पडला.

यावेळी या चित्रपटातील कलाकार सुमित राघवन, उर्मिला कोठारे, डॉ. मोहन आगाशे, सुहास जोशी, पुष्कर श्रोत्री, राजेश भोसले, प्रतीक कोल्हे, मुक्ता पुणतांबेकर, आकांक्षा आठल्ये, रितेश ओहोळ, अर्जुन पुर्णपात्रे, अद्वैत वाकचौडे, अद्वैत धुळेकर आणि मेरवान काळे उपस्थित होते. २०२० च्या उन्हाळ्यात हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा - ‘लता भगवान करे’चा प्रेरणादायी टीजर प्रदर्शित
या चित्रपटाची निर्मिती सिद्धार्थ महादेवन, सौमिल शृंगारपुरे आणि सौमेंदु कुबेर यांच्या शो बॉक्स एंटरटेन्मेंटतर्फे आणि अरुंधती दात्ये, अनुप निमकर, सलील कुलकर्णी आणि नितीन प्रकाश वैद्य यांच्या गजवदन प्रॉडक्शन्स तर्फे होत आहे. पहिल्या सिनेमाप्रमाणेच सलील कुलकर्णी ‘एकदा काय झालं’ मध्येही लेखक, दिग्दर्शक आणि संगीतकार या विविधांगी भूमिकेत रसिकांसमोर येणार आहे. 'वेडिंगचा शिनेमा'मधल्या त्याच्या या तिन्ही भूमिकांचं कौतुक झालं होतं.

हा चित्रपट एका बाप-मुलाच्या नात्यावर आधारित असू शकतो असा अंदाज चित्रपटाच्या पोस्टरवरून बांधला जाऊ शकतो. पहिल्या सिनेमातली मल्टी स्टारकास्ट आणि त्यातही सिनेमा उत्तम निभावून नेणं प्रशंसनीय आहे. त्यामुळे सलील कुलकर्णी दुसऱ्या सिनेमात नेमकं कोणत्या आव्हानाला सामोरं जातात आणि कोणता नवीन विषय घेऊन भेटीला येतात, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
हेही वाचा -विनोदी वेबसीरीज 'कॉमेडी कॉकटेल' रसिकांच्या भेटीला . .