मुंबई - मराठी सिनेसृष्टीतील परफेक्ट कपल म्हणून सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांना ओळखले जाते. विशेष म्हणजे दोघांचाही एकाच दिवशी वाढदिवस आहे. त्यांनी बऱ्याच मराठी चित्रपटांमध्ये एकत्र भूमिका साकारल्या आहेत. 'नवरी मिळे नव-याला' या सिनेमाच्या सेटवर दोघांची भेट झाली आणि ही रिल लाईफ जोडी रिअल लाईफमध्ये एकत्र आली. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात या काही खास गोष्टी...
सुप्रिया या सचिन पिळगांवकर यांच्यापेक्षा तब्बल १० वर्षांनी लहान आहेत. २१ डिसेंबर १९८५ साली सचिन-सुप्रिया यांच्या सहजीवनाला सुरुवात झाली. या दाम्पत्याला श्रिया ही एकुलती एक लेक आहे. दोघांच्याही लग्नाला ३० वर्षे पूर्ण झाली आहेत.
सचिन यांनी अगदी लहानपणापासूनच चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये बालकलाकाराची भूमिका साकारली. हिंदीमध्येही त्यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. यापैकी 'गीत गाता चल', 'नदीयां के पार', 'अंखियों के झरोखो से' हे चित्रपट विशेष गाजले.
सुप्रिया यांनी मात्र, लग्नानंतर काही वर्षे संसाराला प्राधान्य दिले.
मुलगी श्रियाच्या जन्मानंतर तिचे संगोपन हेच त्यांचे प्राधान्य होते. मात्र, तरी सुध्दा त्यांनी जमेल तसे चित्रपट, आणि टी.व्ही. मालिकांमध्ये भूमिका साकारल्या.
त्यांच्या 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' या मालिकेलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
आता सुप्रिया आणि सचिन यांची मुलगी श्रिया हिनेही अभिनयात पदार्पण केलं आहे. तिने सचिन पिळगावंकर यांच्यासोबतच 'एकुलती एक' चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. तसेच, शाहरुखच्या 'फॅन' चित्रपटातही तिने भूमिका साकारली.
सचिन - सुप्रिया यांचे गाजलेले मराठी चित्रपट
- नवरी मिळे नवऱ्याला
- आम्ही सातपुते
- नवरा माझा नवसाचा
- आयत्या घरात घरोबा
- अशी ही बनवाबनवी
- माझा पती करोडपती