मराठी चित्रपटसृष्टीत दोन दशकाहून अधिक यशस्वी कारकीर्द असणारा लोकप्रिय अभिनेता पुष्कर श्रोत्री यांने आपल्या वाढदिवसाच्या पूर्वसंद्या अनोख्या पद्धानीने साजरी करत वयाच्या ५० व्या वर्षात पदार्पण केले. कुटुंबीय, नातेवाईक, चाहते, मित्र परिवारासह दरवर्षी वाढदिवस साजरा करणाऱ्या पुष्कर यांने यंदा आपला वाढदिवसाची पूर्वसंध्या पत्रकार मित्र, मैत्रिणींसोबत अनौपचारिक गप्पा मारत अनोख्या अंदाजात घालवली. यावेळी अभिनेते, दिग्दर्शक विजय केंकरे, निर्माते श्रीपाद पद्माकर, अभिनेते आनंद इंगळे गायक - संगीतकार अजित परब, दिग्दर्शक आदित्य इंगळे आदी उपस्थित होते.
या विषयी बोलताना पुष्कर म्हणाला, की वयाच्या पन्नाशीत पोहचत असतानाच माझ्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या संपूर्ण काळात कुटुंब, मित्र परिवार यासह प्रसार माध्यमातील मित्र, मैत्रिणींचा मोठा सहभाग राहिला आहे, मी आणि माझ्या चाहत्यामधील ते एका महत्वाचा दुवा आहेत, यामुळे वाढदिवसाची पूर्वसंध्या मी त्यांच्या समवेत साजरी केली. मी पानी फाउंडेशनसाठी दरवर्षी श्रमदान करतो, यंदा १ मी रोजी माझे संपूर्ण कुटुंब या श्रमदानात सहभागी होणार आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात गराडे या गावात आम्ही श्रमदान करणार आहोत.
दरम्यान, ५० व्या वर्षातील पदार्पणानिमित्त ‘पुष्कर शो THREE’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये माझ्या ‘आम्ही आणि आमचे बाप’, ‘अ परफेक्ट मर्डर’, ‘हसवा फसवी’ या तीन नाटकांचा महोत्सव दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले येथे रविवार दि. ५ मे रोजी होणार आहे. आदी कल्चरटेन्मेंट निर्मित ‘आम्ही आणि आमचे बाप’ या सकाळी ११ वा. सादर होणाऱ्या या प्रयोगाचे उत्पन्न ठाण्यातील ‘सिग्नल शाळा’ संस्थेला देण्यात येईल. बदाम राजा निर्मित ‘अ परफेक्ट मर्डर’ या दुपारी ४ वा. सादर होत असलेल्या प्रयोगाचे उत्पन्न कोल्हापुरातल्या ‘चेतना’ संस्थेला दिले जाईल. तर रात्री ८.३० वा. जिगिषा-अष्टविनायक निर्मित दिलीप प्रभावळकर लिखित व चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘हसवा-फसवी’चा प्रयोग होणार आहे. या प्रयोगाचे उत्पन्न अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या संकल्पनेतून कर्जत येथे उभ्या राहणाऱ्या ‘कलाश्रय’ या वृद्धाश्रमाच्या स्थापनेसाठी दिले जाणार असल्याचे पुष्करने स्पष्ट केले आहे.