मुंबई - 'जे शेष आहे ते विशेष आहे', असा संदेश देणाऱ्या 'प्रवास' सिनेमाचा म्यूझिक लॉन्च सोहळा अलिकडेच मुंबईत पार पडला. या सिनेमाच्या निमित्ताने अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र भूमिका साकारताना दिसणार आहेत.
अभिनेता शशांक उदापूरकर यांनी 'प्रवास' सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. यापूर्वी त्यांनी 'छत्रीपती संभाजी महाराज' आणि 'अण्णा' यांसारख्या सिनेमांसाठी काम केले आहे. आता 'प्रवास'च्या निमित्ताने एका वृद्ध दाम्पत्याची हृदयस्पर्शी कहाणी दाखवण्याचा प्रयत्न त्याने केला आहे.
या सिनेमाचा म्यूझिक लॉन्च सोहळा अनुप जलोटा यांच्या हस्ते पार पडला. या सिनेमाद्वारे हिंदी सिनेसृष्टीतील मोठी संगीतकार जोडी सलीम-सुलेमान यांनी पहिल्यांदा मराठीत पदार्पण केले आहे. तर, सोनू निगम, श्रेया घोषाल, हरिहरन यांनी या सिनेमातील गाणी गायली आहेत. सिनेमाची गाणी प्रेक्षकांना नक्की आवडतील, अशी कलाकारांची अपेक्षा आहे.
हेही वाचा -नव्या वर्षात राणादा,अंजलीबाईंचा नव्या वास्तुत प्रवेश, वसगडे ऐवजी केर्लीत होतंय शूटींग
अभिनेते अशोक सराफ हे कायमच काहीतरी वेगळं मांडण्याचा प्रयत्न आपल्या भूमिकेद्वारे करतात. या सिनेमातही त्यांची वेगळी भूमिका पाहायला मिळणार आहे. तसेच. पद्मिनी कोल्हापूरे यांनीही एवढ्या वर्षांनी मराठी सिनेमात काम करताना अशोक मामा सोबत असल्याने मला फारस दडपण जाणवलं नाही, असं स्पष्ट केलं.
हा सिनेमा येत्या ३१ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या उर्वरित आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोण मिळवून देईल, असा विश्वास सिनेमाच्या टीमने व्यक्त केला आहे.
हेही वाचा -Exclusive : वसगडेच्या वाड्यातून अंजलीबाई-राणादाचं शिफ्टिंग, चित्रीकरणाचं ठिकाण बदललं