मुंबई - सोनाली कुलकर्णी व प्रार्थना बेहेरे या मराठी चित्रपटसृष्टीतील अग्रगण्य अभिनेत्री आहेत. या दोघींनी आता एक आगळीवेगळी ‘हॅट्ट्रिक‘ केली आहे. प्रार्थना व सोनाली या दोघी खास मैत्रिणी असून त्यांनी याआधी ‘मितवा’ आणि ‘ती आणि ती‘ चित्रपटांत एकत्र काम केले होते. आता त्या दोघी पुन्हा एकदा नवीन चित्रपटातून एकत्र आल्या आहेत. ‘फ्रेश लाईम सोडा’ हा त्यांचा तिसरा चित्रपट आहे.
रेडबल्ब स्टुडिओने त्यांच्या २०२१ मधील नवीन चित्रपटाची नुकतीच घोषणा केली आहे. अभिषेक जावकर हा ‘फ्रेश लाईम सोडा’ चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक आहे. अभिषेक हा प्रार्थनाचा नवरा असून सोनाली त्याला प्रेमाने ‘जीजू’ बोलावते. यावरुन सोनाली आणि प्रार्थना यांची मैत्री किती घट्ट आहे हे निदर्शनास येते. चित्रपटाची निर्मिती रेडबल्ब स्टुडिओ, अनपॅरारल्ड मीडिया आणि फ्लेजर्स एंटरटेनमेंट करणार आहेत. निर्मात्यांनी या चित्रपटाचे पोस्टर अनावरीत केले आहे.
‘फ्रेश लाईम सोडा’ मध्ये सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहेरे ह्या खास मैत्रिणी पुन्हा एकदा प्रेक्षकांना एकत्र दिसणार आहेत. लवकरच हा चित्रपट लोकांना थिएटरमध्ये अनुभवता येईल. चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये ‘प्रवास स्वप्नांचा’ हे घोषवाक्य दिसत असून सूर्यास्ताच्या वेळी दोघीजणी एका कारच्या बाहेर येऊन जल्लोष करताना दिसत आहेत. समुद्रकिनारी उभ्या असलेल्या या वाहनाच्या नंबर प्लेटवर ‘ऑगस्ट २०२१’ दिसत असून त्यावेळी हा चित्रपट प्रदर्शित होणे अपेक्षित आहे.