मुंबई - चित्रपटाचे पोस्टर नेहमीच चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढविणारे असावे असे जाणकार सांगतात. त्यालाच अनुसरून आगामी मराठी चित्रपट ‘ढिशक्यांव’चे पोस्टर बनले असावे. ‘ढिशक्यांव'च्या पोस्टरवरील पाठमोऱ्या मुलीचे गुपित काय आहे, हा प्रश्न सध्या प्रेक्षक विचारताहेत. दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांचा नवाकोरा 'ढिशक्यांव' चित्रपट, विनोदी आणि विसंगत प्रकारची कथा घेऊन सिनेमाघरांत रुजू होण्यास सज्ज झाला आहे. यातच भर म्हणजे विनोदासह या चित्रपटाच्या कथेला जोड मिळाली आहे ती रोमँटिक कथेची. विनोद आणि प्रेम याचे उत्तम समीकरण साधणारा आणि नाद या शब्दाला धरून कथानक रंगवणाऱ्या या चित्रपटाच्या नावानेही उत्सुकता ताणली आहे.
खिचीक, डॉक्टर डॉक्टर आणि जिऊ या तीन महत्वपूर्ण चित्रपटांच्या दिग्दर्शनानंतर दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांचा हा चौथा सिनेमा आहे. ‘ढिशक्यांव’ चित्रपटाची कथा लेखक संजय नवगिरे लिखित आहे. चित्रपटाच्या पोस्टर लाँच नंतर उत्सुकता लागून राहिली आहे ती कलाकारांची. नेमके कोणते कलाकार या चित्रपटात झळकणार, ते कोणती भूमिका साकारणार याकडे साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या नजरा वळल्या आहेत.
चित्रपटाचे पोस्टर पाहता पोस्टर मध्ये उभी असलेली सुंदर, कमनीय युवती आणि बंदूकीसह पोस्टर मध्ये दाखवण्यात आलेला हात नक्की कोणत्या कलाकारांचा आहे हे गुपित भंडावून सोडणारे आहे. ‘ढिशक्यांव'ची निर्मिती मोहम्मद देशमुख आणि उमेश विठ्ठल मोहळकर यांनी केली असून दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील हेसुद्धा निर्मात्याच्या भूमिकेत आहेत. राजीव पाटील, सुनील सूर्यवंशी आणि उमाकांत बरदापुरे यांची सह निर्मिती असलेला 'ढिशक्यांव' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा - ‘डान्स दिवाने’च्या मंचावर माधुरी दीक्षित थिरकली श्रीदेवीच्या गाण्यावर !