मुंबई - येथील सर्वात जुने आणि पहिले वहिले थियेटर म्हणून ओळखले जाणारे 'गंगा जमुना चित्रपटगृह' हे जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. या चित्रपटगृहाची वास्तू फारच जूनी असल्यामुळे मुंबई महापालिकेने हे चित्रपटगृह पाडण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महापालिकेने या चित्रपटगृहाच्या मालकाला नोटीसही बजावली आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता हे सर्वात जुने असलेले थिएटर पाहता येणार नाही.
मागील काही दिवसापूर्वी जुहू येथील चंदन कॅडर आणि दादरमधील चित्रा थिएटर बंद करण्यात आले आहे. अशातच मुंबईतील ताडदेवमधील सर्वात जुनी ओळख असणारे चंदन थिएटरही जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. मागील पंधरा वर्षांपासून गंगा जमुना बंद होते. परंतु, हे थिएटर डागडुजी करून तशाच दिमाखात उभे होते. आता मात्र, पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात या चित्रपटगृहाची वास्तू धोकादायक असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे ते पाडण्यात येणार आहे.
'गंगा जमुना चित्रपट गृह' हे ७० च्या दशकात बांधले गेले होते. या चित्रपटगृहात 'हरे रामा हरे कृष्णा' हा पहिला चित्रपट दाखवण्यात आला होता. तसेच 'सुहाग', 'मिस्टर नटवरलाल', 'कालीचरण' यांसारख्या चित्रपटांनाही येथे मोठा प्रतिसाद मिळाला. 'जान हाजीर है' हा चित्रपट येथे तब्बल ७५ आठवडे चालला होता.
तब्बल ३०५९ स्क्वेअर मीटर परिसरात उभ्या असलेले हे चित्रपटगृह एकूण ८ मजल्याचे होते. या चित्रपटगृहात बरेचसे शॉपिंग मॉलही होते. सर्वात जुने असलेले हे चित्रपटगृह आता पाडण्यात येत असल्याने स्थानिक लोक हळहळ व्यक्त करत आहेत.