मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील महान कलावंत निळू फुले यांचा आज 11 वा स्मृतिदिन. 13 जुलै 2009 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला आणि संपूर्ण मराठी मनोरंजन विश्व सुन्न झाले. आज निळू भाऊ जगात नसले तरी त्यांनी अजरामर केलेल्या भूमिका, त्यांचे किस्से, नाटक आणि चित्रपटांच्या चित्रफिती यातून ते आपल्याला भेटत असतात. त्यांच्या स्मृतिदिनी आपण त्यांना आदरांजली वाहून आठवणी जागवूयात.
निळू फुले यांचा जन्म १९३० मध्ये पुणे येथे झाला. त्यांचे वडील लोखंड आणि भाजी विकून मिळणार्या पैशावर चरितार्थ चालवत असत. निळू फुलेंनी मॅट्रिकपर्यंतच शिक्षण घेतले. पण, आपली अभिनयाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतः 'येरा गबाळ्याचे काम नोहे' हा वग लिहिला. त्यानंतर पु. ल.. देशपांडे यांच्या नाटकात 'रोंगे'ची भूमिका साकारून त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. मात्र 'कथा अकलेच्या कांद्याची' या वगनाट्यातील भूमिकेमुळे ते कलाकार म्हणून खर्या अर्थाने पुढे आले.
निळू फुले मूळचे समाजवादी विचारांचे कार्यकर्ते. राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकातून ते रंगभूमीपर्यंत पोहोचले आणि कथा अकलेच्या कांद्याची या लोकनाट्याद्वारे पदार्पण केले. 'एक गाव बारा भानगडी' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, आणि सलग 40 वर्षे या चित्रपटसृष्टीत व रंगभूमीवर कारकीर्द केली. निळू फुले यांनी 12 हिंदी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत, तर मराठी भाषेतल्या जवळपास 140 चित्रपटांमधून काम केले आहे. त्यांच्या भूमिकांपैकी 'चोरीचा मामला', 'पुढचं पाऊल', 'शापित', 'सामना', 'सिंहासन' यांतील भूमिका विशेष गाजल्या.
नाटक आणि सिनेमा या दोन्ही क्षेत्रात निळूभाऊंनी स्वतःचा ठसा उमटवला . नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका करणार्या निळूभाऊंचे ग्रामीण आणि शहरी जीवनाचे निरीक्षण अतिशय अचूक होते . या निरीक्षणाचा त्यांनी अभिनयात खुबीने उपयोग केला. सहज सुंदर अभिनय करणार्या निळूभाऊंनी काल्पनिक कथेतला कलाकार जिवंत केला .
निळू फुले यांचे 13जुलै 2009 रोजी पहाटे दोनच्या सुमारास निधन झाले. अन्ननलिकेच्या कर्करोगाने अंथरुणाला खिळून असलेल्या निळू फुले यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
गाजलेली लोकनाट्ये
कथा अकलेच्या कांद्याची, कुणाचा कुणाला मेळ नाही, पुढारी पाहिजे, बिन बियाचे झाड, मी लाडाची मैना तुमची, राजकारण गेलं चुलीत, लवंगी मिरची कोल्हापूरची, वगैरे.
खऱ्या आयुष्यात अतिशय सज्जन, प्रमाणिक असलेले निळू फुले हे रुपेरी पडद्यावर मात्र वेगळे दिसायचे. करारी इरसाल पुढारी सादर करावा तर तो फक्त निळू फुलेंनीच. त्यांचे पडद्यावर आगमन होताच एक प्रकारचे दहशत निर्माण व्हायची. खासगी आयुष्यात नैतिकतेच उत्तम उदाहरण असलेले निळू फुले सिनेमाच्या पडद्यावरचे महान खलनायक होते. त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांना आदरांजली.
हेही वाचा - निर्मात्यांना भुरळ घालणारे कथानक ‘देवदास’...आणि बरंच काही!