मुंबई - डॉ. सलील कुलकर्णी लिखित आणि दिग्दर्शित 'वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी सोशल मीडियावर चांगलीच पसंती दिली. सिनेमातील विनोदी संवाद आणि फ्रेश लूक इतकीच चर्चा आहे ती या सिनेमाच्या कास्टिंगची आणि त्यासाठी डॉ.सलील कुलकर्णी यांना मदत केली आहे त्यांची मैत्रीण आणि या सिनेमाची अभिनेत्री मुक्ता बर्वेने.
या सिनेमाची कथा सलील यांनी सुरुवातीला ज्या लोकांना ऐकवली त्यात मुक्ताचा समावेश होता. ही कथा लिहितानाच सलील यांच्या डोक्यात काही लोक निश्चित होते. मात्र ही कथा ऐकल्यावर मुक्ताने सलीलला कास्टिंग साठी काही सल्ले दिले आणि त्यानुसार त्यांनी ज्यांना ज्यांना विचारलं ते सगळेजण आज या सिनेमाचा भाग आहेत. मुक्ता या सिनेमात एका वेडिंग फिल्म दिग्दर्शिकेची भूमिका करते. तर भाऊ कदम हा तिच्या कॅमेरामन म्हणजेच डीओपीच्या भूमिकेत आहे. प्रवीण तरडे हिरोच्या मित्राच्या भूमिकेत आहे.
याशिवाय मुलाच्या आईच्या भूमिकेसाठी मुक्ताने अलका कुबल यांचं नाव सुचवलं. अलकाताईंना ही भूमिका एवढी आवडली की डोळ्यात ग्लिसरीन न घालता केलेली ही पहिली भूमिका असल्याचं त्यानी सांगितलं. तर नवऱ्या मुलाच्या वडिलांच्या भूमिकेत शिवाजी साटम दिसणार आहेत. याशिवाय अश्विनी काळसेकर आणि सुनील बर्वे हे नवऱ्या मुलीच्या आईवडीलांच्या भूमिकेत आहेत. संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमधर यांच्याही यात मुख्य भूमिका आहेत.
सिनेमाची गोष्ट जरी मुक्ताचा भूमिकेच्या अवती भोवती फिरणारी असली तरीही या सगळ्याच भूमिका फारच वेगळ्या आहेत. ट्रेलर पाहिल्यावर ते आपल्याला समजते. याशिवाय सलीलच्या सिनेमात संदीप खरे नाहीत असं होण शक्य नाही. सिनेमाची गाणी लिहिण्यासोबतच सिनेमात एका खास भूमिकेत ते दिसणार आहेत.त्यामुळे कास्टिंगच्या बाबतीत तरी हा सिनेमा लय भारी आहे एवढं नक्की.