मुंबई - ‘कोर्ट’ या सिनेमाद्वारे देशा-परदेशात नावाजला गेलेला दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेचा ‘द डिसायपल’ हा सिनेमा ‘व्हेनिस चित्रपट महोत्सवा’साठी निवडला गेला आहे. विशेष म्हणजे या चित्रपट महोत्सवातील ‘गोल्डन लायन’ या विभागात चैतन्यच्या या सिनेमाची स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली आहे.
या सिनेमाच्या निमित्ताने तब्बल २० वर्षांनी व्हेनिस चित्रपट महोत्सवात भारतीय सिनेमाची निवड करण्यात आलेली आहे. १९३२ साली सुरू झालेला ‘व्हेनिस अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ हा सीनेप्रेमींमध्ये अत्यंत प्रतिष्ठेचा चित्रपट महोत्सव म्हणून ओळखला जातो. यंदा या चित्रपट महोत्सवाच्या ७७व्या वर्षात चैतन्यच्या ‘द डिसायपल’ची निवड झालेली आहे. यापूर्वी २०१४ साली त्याचाच ‘कोर्ट’ या सिनेमाला व्हेनिस चित्रपट महोत्सवातील ‘हॉरिझन्स’ विभागात सर्वोत्कृष्ट सिनेमासह अजून एक पुरस्कार मिळालेला होता.
‘द डिसायपल’ या सिनेमाची कथा एका शास्त्रीय गायकाच्या आयुष्यावर आधारित आहे. या सिनेमाची व्हेनिस चित्रपट महोत्सवासाठी निवड होणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब असून मी आणि माझ्या टीमने केलेल्या मेहनतीची ती पावती असल्याची प्रतिक्रिया चैतन्यने दिलेली आहे. यापूर्वी १९३७ साली प्रदर्शित झालेला ‘संत तुकाराम’ आणि त्यानंतर मीरा नायर यांचा ‘मॉन्सून वेडिंग’ या चित्रपटांची ‘गोल्डन लायन’ विभागासाठी निवड झालेली होती. त्यानंतर तब्बल २० वर्षांनी एका भारतीय आणि त्यातही मराठी सिनेमाला हा बुहमान मिळालेला आहे.