देशावर किंवा देशातील कुठल्याही भागावर अरिष्ट कोसळलं की अनेक मदतीचे हात धावून येतात. बऱ्याचवेळा नैसर्गिक आपत्ती ओढवलेल्या राज्यांच्या मदतीसाठी बॉलिवूडकर उतरताना दिसले आहेत. भारताची राजधानी मुंबईमध्ये चित्रपटसृष्टी एकवटली आहे आणि बहुतेक सर्वच टॉपचे कलाकार महाराष्ट्राबाहेरून मुंबईत आलेले आहेत व त्यांनी भरपूर पैसे आणि नाव कमावले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार नेहमीच चांगली कमाई करतानाही दिसतात म्हणूनच बहुतेक कलाकार अत्यंत महागड्या घरांत राहतात आणि महागड्या गाड्यांतून फिरतात. चांगली गोष्ट आहे. पूर्वी देशात कुठलेही संकट आले, उदा. युद्ध, दुष्काळ, ओला दुष्काळ, ढगफुटी इत्यादी.. पूर्वी बॉलिवूडकर मदतीसाठी रस्त्यावर उतरत आणि मदत गोळा केली जात असे.
सध्या महाराष्ट्र अतिवृष्टीमुळे बुडाला आहे, खासकरून कोकण, म्हणजे १९९५ च्या २६ जुलैच्या अतिवेष्टीने मुंबईचे जे हाल झाले होते त्याच्या कैकपटीने कोंकणात नुकसान झालंय. राज्यात भीषण परिस्थिती आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात झालेल्या तुफान पावसाने अनेकांचे संसार वाहून गेलेत. कित्येकांच्या घराच्या केवळ भिंती उरल्यात. रायगड, सांगली, कोल्हापूर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये दरड कोसळून शेकडो लोक मृत्युमुखी पडलेत. अजूनही कित्येक गावं पाण्याखाली आहेत. पुराच्या पाण्याने सगळीकडे गाळ आणि चिखल साचला आहे. राज्यशासनामार्फत आणि समाजसेवी संस्थांमार्फत सगळीकडे मदतकार्य सुरू आहे. अशावेळी बॉलिवूडकरांनी मदत करणं अपेक्षित होतं. परंतु मदत तर सोडा, या महापुराची कोणी साधी दखलही घेतलेली नाही. सतत समाज माध्यमांवर देशातील आणि जागतिक समस्यांबद्दल जागरूक आहोत असे दाखविणाऱ्या सेलिब्रिटीजनीसुद्धा याबाबत संवेदनशीलता दर्शविलेली नाही.
आता, कोणी कोणाला ‘आम्हाला मदत करा’ अशी आज्ञा देऊ शकत नाही तरीही देशातील इतर समस्यांवेळी हिरीरीने पुढे असणारी बॉलिवूडची मंडळी महाराष्ट्रातील आपत्तीबाबत मूग गिळून गप्प आहेत. त्यातील अनेकांचे राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांसोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि दरवेळी शासनाने त्यांना मदतीचा हात देऊ केला आहे. या ओठांवर बोट ठेऊन बसलेल्या बॉलिवूडकरांच्या वृत्तीबाबत मनसे सिनेमा विंगचे अध्यक्ष आणि चित्रपटनिर्माते अमेय खोपकर यांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि खास ‘मनसे’ स्टाइलमध्ये खडे बोल सुनावले. 'इतर राज्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीनंतर बॉलिवूडमधून मदतीसाठी अनेकजण पुढे येतात. माझ्या राज्यात पूर आल्यानंतर एकाही बॉलिवूड कलाकाराला साधं ट्विटही करावंसं वाटत नाही, याचं आश्चर्य वाटतं. अनेक स्वयंसेवी संस्थांनी मदतकार्य सुरू केलं आहे. अशावेळी माझ्याच महाराष्ट्रात राहून मोठं झालेल्या बड्या बॉलिवूड ताऱ्यांनी थोडं संवेदनशील व्हावं आणि मदत कार्याला हातभार लावावा, असं जाहीर आवाहन करतो’ असे ट्विट त्यांनी केले ज्याचे अनेक नेटकऱ्यांनी समर्थन केलं आहे.
महाराष्ट्रात राहून पैसे कमावलेत आता महाराष्ट्राला मदत करण्याची वेळ आली आहे हे ध्यानात घेत, आणि बॉलिवूडकरांनी जरी पाठ फिरविलेली असली तरी, मराठी कलाकारांनी पुढे येत मदतीचा हात पुढे केला आहे. सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामांसाठीसुद्धा होऊ शकतो हे मराठी कलाकारांनी दाखवून दिले. मराठी आणि बॉलिवूड मुव्हीजमध्ये झळकणार सिद्धार्थ जाधव म्हणाला, ‘चला एकत्र येउया, आपल्या माणसांसाठी’...म्हणत महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागात मदत पोहोचविण्यासाठी पुढाकार घेतलाय. इतर अनेक मराठी कलाकार या मदत मोहिमेसोबत जोडले गेले आहेत. मृण्मयी देशपांडे, भाऊ कदम, हेमंत ढोमे, तेजस्वीनी पंडित, भरत जाधव, सुयश टिळक, केदार शिंदे, सोनाली खरे, सोनाली कुलकर्णी, स्वप्नील जोशी, उमेश कामत, अभिज्ञा भावे, रवी जाधव, सुकन्या मोने, ऋतुजा बागवे आदी अनेक कलाकार आपापल्यापरीने मदत करीत आहेत आणि त्यांच्या चाहत्यांनाही मदतीचे आवाहन करीत आहेत. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी कपडे, अंतर्वस्त्रे, सुके खाणे, किराणा सामान इ. प्रकारची मदत अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रात येऊन त्याच मातीत मोठे झालेले बॉलिवूडकर जरी महाराष्ट्रातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले नसले तरी मराठी कलाकारांनी एकत्रितपणे पुढे येऊन अतिवृष्टी झालेल्या भागात मदत पोहोचविण्याचे कार्य हाती घेतले असून सामान्य जनताही त्यांना सहकार्य करीत आहे. यापुढे मराठी प्रेक्षकांनी ठरवायला हवे की कोणाच्या चित्रपटांना गर्दी करावी, जे आपत्तीत महाराष्ट्रासोबत उभे राहतात की त्याकडे कानाडोळा करतात.