चमचमत्या जगातील भक्कम कारकिर्द सोडून राजकारणात प्रवेश करण्याचा धाडसी निर्णय स्मृती इराणी यांनी घेतला. एखाद्या कलाकाराच्या आयुष्यातील हे दुर्मिळ उदाहरण असू शकेल. २००३ मध्ये संपूर्ण देशाची नजर छोट्या पडद्यावरील तुलसीला पाहायला आतुर असायची. त्याच काळत स्मृती यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. २००४ मध्ये दिल्लीच्या चांदणी चौकातून कपील सिब्बल यांच्या विरोधात त्या पराभूत झाल्या. २०१४ मध्येदेखील राहूल गांधी यांच्या विरोधात त्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र पण हार न मानता त्या राजकारणात कार्यरत राहिल्या. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत त्यांनी राहूल गांधी यांना अमेठीतून पराभूत करुन आपल्या लढण्याची जिद्द दाखवून दिली.
हारकर जितने वालो को बाजीगर कहते है' हा हिंदी सिनेमातीतील डायलॉग स्मृती इराणींसाठी चपखल लागू होतो. सिल्व्हर स्क्रिन वरील या उमद्या अभिनेत्रीने स्वतःला राजकारणात झोकून दिले आणि काही काळातच एक मुरलेली राजकारणी असा दबदबा निर्माण करण्या इतपत यश मिळवलंय. 'क्यूं की सास कभी बहु थी' या शो मधील 'तुलसी विराणी' जशी घराघरात पोहोचली तशाच स्मृती इराणी राजकीय प्रतिमा घेऊन घराघरात पोहोचल्या आहेत.
नऊ वेळा इंडियन टेलिव्हिजन अॅकॅडमी पुरस्कार मिळवणाऱ्या स्मृती इराणी त्यांच्या चतुरस्त्र अभिनयामुळे कायम चर्चेत राहिल्या. केवळ छोट्या पडद्या पुरत्या मर्यादित न राहता सिनेमा, नाटक, जाहिराती यासारख्या क्षेत्रातही त्यांनी नाव कमावले. हिंदी, बंगाली आणि तेलुगु चित्रपटातही त्या झळकल्या.
आठ वर्षे 'क्यूँकी सास भी कभी बहु थी' मालिकेत सलग प्रसिद्धी झोतात राहिलेल्या स्मृती यांनी १९९८ मध्ये 'मिस इंडिया' स्पर्धाही गाजवली होती. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्मृती इराणी यांनी राजकारणात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.
'यूपीसीसी'च्या अध्यक्षा रिटा बहुगुणा यांनी स्मृतीबद्दल एक विधान केले होते. त्या म्हणाल्या होत्या, ''इराणी या टीव्ही अभिनेत्री आहेत, राजकारणी नाहीत. त्या लोकांच्यामध्ये केवळ उत्कंठा निर्माण करु शकतात. परंतु त्या निवडणुकीत लढू शकत नाही.'' रिटा बहुगुणा यांचे विधान सपशेल खोटे ठरवण्यात स्मृती इराणी यशस्वी ठरल्या आहेत. अमेठीतून राहूल गांधी यांना पराभवाची धूळ चारुन त्यांनी हे सिध्द करुन दाखवलंय.
स्मृती इराणी या आजच्या राजकारणातील भारतीय जनता पक्षाचा महत्वाचा चेहरा बनल्या आहेत. बिंदी, सिंदूर आणि साडी अशी 'भारतीय नारी'ची प्रतिमा तयार करण्यात त्यांना यश लाभलयं. मानव संसाधन मंत्रालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालय सांभाळलेल्या स्मृती इराणी सध्या वस्त्रोद्योग आणि महिला बालकल्याण मंत्रालय सांभाळत आहेत.