मुंबई - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे देण्यात येणाऱ्या कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्काराची घोषणा झाली आहे. २०१० पासून हा पुरस्कार देण्यात येतो. यंदा साहित्यिक, चित्रपट लेखक आणि दिग्दर्शक वेद राही यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी याबद्दल घोषणा केली आहे.
रोख रूपये १ लाख, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. मूळचे जम्मू-काश्मीरचे असणाऱ्या राही यांनी उर्दू, हिंदी आणि डोगरी भाषेत बरंच लेखन केले आहे. याशिवाय त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांसाठी डायलॉग लिहिले आहेत. यात चरस, बेजूबान, मॉम की गुडियासारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
त्यांच्या लेखणीतून डोगरी भाषेतील ७ कादंबऱ्याही सााकारल्या आहेत. १९८३ मध्ये 'आले' या डोगरी कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला. याशिवाय त्यांनी वीर सावरकरसारखा बायोपिकही प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता. तर १९९१ मध्ये आलेल्या दुरदर्शनवरील 'गुल गुलशन गुलफाम' मालिकेचे त्यांनी दिग्दर्शनही केले होते.