मुंबई - कठुआ लैंगिक अत्याचार आणि बालिकेचा खुन प्रकरणात तिघा जणांना जन्मठेपेची शिक्षा सोमवारी ठोठावण्यात आली. पठाणकोट न्यायालयाने हा निकाल दिला. त्यानंतर दोषींना फाशी व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे.
जन्मठेप की मृत्यूदंड या पैकी कोणती शिक्षा अशा प्रकरणात योग्य अशा आशयाचा प्रश्न प्रसिध्द लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांना विचारण्यात आला. हे कृत्य घृणास्पद असल्याचे सांगत त्यांनी शिक्षेचे समर्थन केले.
जावेद अख्तर म्हणाले, "कठुआ केस प्रकरणातील दोषींना जन्मठेप झाल्याची बातमी मी टीव्हीवर नुकतीच पाहिली. या दोषींना मृत्यूदंड दिला नसल्यामुळे काही लोक नाराज झाल्याचेही मी ऐकले. कारण त्यांना असे वाटते की हे आरोपी मृत्यूदंडास पात्र आहेत.", पुस्तक प्रकाशन समारंभात जावेद अख्तर बोलत होते.
"मी प्रामाणिकपणे सांगतो की मृत्यूदंडाची शिक्षा ही योग्य की अयोग्य याबद्दल मला निश्चीत कल्पना नाही हे मी कबुल करतो. मात्र एका गोष्टीची मला खात्री आहे की, मृत्यूदंडाची शिक्षा ज्या देशात लागू आहे त्या देशांमधील गुन्हे कमी झाले नाहीत. तसेच ज्या देशांमधुन मृत्यूदंडाची शिक्षा हटवण्यात आली आहे तेथे गुन्हे कमी झाल्याचेही पाहायला मिळत नाही. त्यामुळे मृत्यूदंड की जन्मठेप यातील कोणती शिक्षा योग्य हे मला निश्चित सांगता येत नाही."
दोषींना शिक्षा झालेली असली तरी अशा प्रकरणातील गुन्हेगार काही दिवसांनी मुक्त झालेले दिसतात, असे जावेद म्हणाले.
"आपल्या समाजात एखाद्याने घृणास्पद कृत्य केले तर त्याला जन्मठेपेची शिक्षा झाल्याचे आपण पाहिले आहे. मात्र दोन तीन वर्षांनी तोच व्यक्ती मुक्तपणे समाजात फिरताना आपण पाहतो. तसेच ती गुन्हेगार व्यक्ती आनंदाने जीवन जगते. या कठुआ प्रकरणातील आरोपींना असे मोकळे सोडता कामा नये., " असेही जावेद अख्तर म्हणाले.
जानेवारी २०१८ मध्ये चिमुकल्या मुलीवर अतिशय घृणास्पद अत्याचार करण्यात आले होते. या प्रकरणी मागील वर्षी एप्रिलमध्ये ८ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. आरोपपत्रानुसार, सांझी राम या अत्याचार आणि हत्याकांडाचा मास्टारमाईंड होता.
चिमुकलीच्या अपहरणानंतर तिला सांझी रामच्या देखरेखीखालील मंदिरात डांबून ठेवण्यात आले होते. आरोपींनी येथेच मुलीवर अमानुष अत्याचार केले होते. कोर्टाने या प्रकरणी पोलीस अधिकारी दीपक खजुरिया, सुरेंद्र वर्मा आणि अरविंद दत्ता, हेड कॉन्स्टेबल तिलक राज आणि प्रवेसकुमार उर्फ मन्नू यांना दोषी ठरविले आहे. तर सांझी रामचा मुलगा विशाल याची मुक्तता केली आहे.
काय आहे प्रकरण ?
जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथील ८ वर्षांची मुलगी मागलीवर्षी १० जानेवारी रोजी बेपत्ता झाली होती. त्यानंतर छिन्नविछिन्न अवस्थेतील तिचा मृतदेह जंगलामध्ये सापडला होता. आरोप आहे की, अपहरणानंतर मुलीला एक मंदिरात डांबून ठेवण्यात आले आणि कित्येक दिवस तिच्यावर अत्याचार करण्यात आले होते.