जावेद यांच्या नावामागची मजेशीर गोष्ट म्हणजे त्यांचे खरे नाव जादू आहे. त्यांचे वडिल आणि नामवंत कवी निसार अख्तर यांच्या 'लम्हा लम्हा किसी जादू का फसाना होगा' या कवितेवरुन त्यांना जादू हे नाव मिळाले होते. नंतर त्यांनी या नावाच्या जवळ जाणारे जावेद हे नाव धारण केले.
जावेद हे त्यांच्या आईच्या खूप जवळचे होते. मात्र वयाच्या आठव्या वर्षीच त्यांना आईपासून पोरके व्हावे लागले. जेव्हा ते सहा वर्षाचे होते तेव्हाच त्यांच्या आईंना त्यांच्यातील उर्दूच्या प्रतिभेचे जाणीव झाली होती.
त्यांची आई सफिया अख्तर या गायिका, लेखिका आणि शिक्षिका होत्या. मृत्यूच्या आधी जावेद यांनी आईला आयुष्यात मोठे काम करण्याचे वचन दिले होते. मुंबईत आल्यानंतर आईला दिलेले वचन ते कधीच विसरले नाहीत.
जावेद आपला वाढदिवस पहिल्या पत्नी हनी इराणी यांच्यासोबत साजरा करतात. दोघांची भेट सीता और गीताच्या सेटवर झाली होती. जावेद यांनी सलीम खान यांना लग्नाचे प्रपोजल घेऊन हनी यांच्या आईंना भेटण्यासाठी पाठवले होते. गंमत म्हणजे शोलेमधील एका सीनमध्ये धर्मेंद्र अमिताभला बसंतीची आजी लीला मिश्रा यांना लग्नाचे प्रपोजल घेऊन भेटायला पाठवतो. तो सीन खऱ्या आयुष्यात सलीम जावेद यांच्या बाबतीत घडलाय.
जावेद अख्तर यांनी ख्यातनाम उर्दू कवी कैफी आझमी यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम केले. हनी इराणी यांच्यासोबतचा संसार फार काळ टिकू शकला नाही. कैफी आझमी यांची मुलगी शबाना आझमी यांच्यासोबत नंतर त्यांनी विवाही केला.
जावेद अख्तर जेव्हा १९६४ ला जेव्हा मुंबईत दाखल झाले तेव्हा त्यांच्याकडे राहायला छप्पर आणि खायाला अन्नही नव्हते. त्यांनी बराच काळ झाडाखाली आणि चौथऱ्यावर झोपून दिवस काढले. नंतर त्यांना कमाल अमरोही स्टुडिओमध्ये जोगेश्वरीला आश्रय मिळाला. ते स्टुडिओत क्लॅप बॉय म्हणून नोकरी करु लागले.
जावेद अख्तर आणि सलीम खान यांची भेट 'सरहद्दी लुटेरा'च्या शूटींगच्या दरम्यान झाली. जावेद यांना क्लॅपबॉयच्या ऐवजी संवाद लेखन करण्याची संधी एस. एम सागर या दिग्दर्शकाने दिली.
बॉलिवूडमध्ये सलीम जावेद या जोडीने धमाल उडवून दिली. त्याकाळी लेखकाला फार महत्त्व दिले जायचे नाही. इतकेच काय तर लेखकाचे नाव क्रेडिट यादीतही नसायचे. मात्र सलीम - जावेद हे नाव सिनेमाच्या पोस्टरवर झळकू लागले आणि या जोडीने बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले.
जावेद आणि सलीम यांनी १९८० पर्यंत एकत्र काम केले. त्यानंतर जावेद यांनी काही स्वतंत्र लिखान केले. मात्र त्यांना गीतकार म्हणून मिळालेली ओळख कायम राहिली.
जावेद अख्तर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. फिल्मफेयरचे १४ पुरस्कार त्यांना मिळालेत. तर पाचवेळा त्यांना राष्ट्रीय पुरस्कारने सन्मनित करण्यात आलंय. उर्दू साहित्यासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळालाय.